Lucknow Super Giants vs Rajasthan Royals: आयपीएल २०२६ स्पर्धेतील ३२ वा सामना लखनौ सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघामध्ये पार पडला. या सामन्यात लखनौने राजस्थानला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं होतं. पण राजस्थानच्या फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारता आली नव्हती. वैभव सूर्यवंशी या सामन्यात फ्लॉप ठरला. राजस्थानने लखनौसमोर विजयासाठी १६० धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना मिचेल मार्शने दमदार अर्धशतकं झळकावलं. पण त्याला इतर कुठल्याही फलंदाजाकडून साथ मिळाली नाही. तर दुसरीकडे राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी केली. हा सामना राजस्थान रॉयल्सने ४० धावांनी आपल्या नावावर केला.
लखनौ सुपर जायंट्स संघाला हा सामना जिंकण्यासाठी १६० धावांचा पाठलाग करायचा होता. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या लखनौला सुरुवातीलाच मोठा धक्का बसला. आयुष बदोनी शून्यावर धावबाद होऊन माघारी परतला. त्यानंतर कर्णधार ऋषभ पंत आणि एडन मारक्रम देखील शून्यावर माघारी परतला. लखनौला जशी सुरुवात हवी होती, तशी सुरुवात मिळू शकली नाही. एकट्या मिचेल मार्शने पूर्ण जोर लावला. त्याने अर्धशतकी खेळी केली. निकोलस पूरनने २२ धावांचे योगदान दिले. तर हिम्मत सिंगने १५ धावा केल्या. स्फोटक फलंदाज मुकुल चौधरी या सामन्यात अवघ्या ७ धावांवर माघारी परतला. या मोहम्मद शमी अवघ्या ६ धावांवर माघारी परतला. लखनौचा संघ या सामन्यात विजयापासून ४० धावा दूर राहिला.
राजस्थान रॉयल्सने केल्या १५९ धावा
लखनौतील एकाना स्टेडिमवर पार पडलेल्या या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या राजस्थान रॉयल्सने २० षटकांअखेर ६ गडी बाद १५९ धावा केल्या. राजस्थान रॉयल्स संघाला या सामन्यात हवी तशी सुरुवात करता आली नव्हती. कारण यशस्वी जैस्वाल अवघ्या २२ धावा करून माघारी परतला.
तर वैभव सूर्यवंशी देखील काही खास करू शकला नाही. तो अवघ्या ८ धावांवर माघारी परतला. वैभव बाद होताच ध्रुव जुरेल देखील शून्यावर माघारी परतला. कर्णधार रियान परागने या सामन्यात २० धावांचे योगदान दिले. शिमरन हेटमायरने २२ धावांची खेळी केली. शेवटी रवींद्र जडेजा ४३ धावांवर नाबाद राहिला. तर डोनोवन फरेराने २० धावांची खेळी केली.
