Vinod Kambli visited Wankhede Stadium during IPL 2026 match: आयपीएल २०२६ मधील मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबादमधील सामना वानखेडे स्टेडियममध्ये खेळवण्यात आला होता. या सामन्यात धावांचा पाऊस पाहायला मिळाला. दोन्ही संघांनी मिळून चौकार-षटकारांचा पाऊस पाडत ४९२ धावा या सामन्यात केल्या. पण सनरायझर्स हैदराबादने धावांचा पाठलाग करताना सामना जिंकत मुंबईला पराभवाचा अजून एक मोठा दणका दिला. भारताचे माजी क्रिकेटपटू आणि उत्कृष्ट डावखुरे फलंदाज विनोद कांबळी हे देखील स्टेडियममध्ये उपस्थित होते आणि त्यांनी या सामन्याचा पुरेपूर आनंद घेतला.
विनोद कांबळी वानखेडे स्टेडियममध्ये दाखल होतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये विनोद कांबळी दोन व्यक्तींच्या मदतीने स्टेडियमच्या दिशेने चालत जाताना दिसत आहेत. यावेळी त्यांचे चाहते त्यांच्या तब्येतीची विचारपूस करताना आणि त्यांच्यासोबत सेल्फी काढण्याची विनंती करताना दिसत आहेत. चाहत्यांनी विनोद कांबळी लवकर बरे व्हावेत अशा शुभेच्छाही दिल्या आहेत.
विनोद कांबळी सामना पाहण्यासाठी साधा पेहराव करून आले होते. त्यांनी साधा निळ्या रंगाचा शर्ट, तपकिरी पॅन्ट आणि स्पोर्ट्स शूज घातले होते. आरोग्य समस्यांशी झुंज देत असल्याने, स्टेडियमच्या आवारात फिरण्यासाठी त्यांना दोन साथीदारांच्या मदतीची गरज भासत होती. पण तरीही क्रिकेट पाहण्यासाठी उपस्थिती लावून त्यांनी क्रिकेटवर त्यांचा किती जीव आहे, याचा प्रत्यय दिला.
मुंबई इंडियन्सचा सामना पाहण्यासाठी वानखेडेवरील कांबळेंच्या उपस्थितीने क्रिकेट जगताला मोठा दिलासा मिळाला आहे. एप्रिल २०२६ हा महिना कांबळी कुटुंबासाठी फारच त्रासदायक ठरला, त्यांच्या प्रकृतीबद्दल अनेक चिंताजनक बातम्या समोर आल्या आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला, या माजी क्रिकेटपटूला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आल्याच्या अफवा पसरल्या होत्या. विशेषतः त्यांच्या मेंदूतील रक्ताच्या गाठी आणि स्ट्रोकचा धोका असल्याची माहिती समोर आली होती. पण त्यांच्या पत्नी, अँड्रिया यांनी ही सर्व माहिती त्वरित नाकारली.
अलीकडेच, विनोद कांबळी यांना ब्रेन स्ट्रोकचा धोका असल्याची बातमी समोर आली आहे. गेल्या दोन वर्षांपासून कांबळी यांची प्रकृती खालावत आहे. सचिन तेंडुलकरचे बालपणीचे मित्र असलेल्या विनोद कांबळी यांना डिसेंबर २०२४ मध्ये मूत्रमार्गाच्या संसर्गामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आरोग्याच्या समस्यांसोबतच विनोद कांबळी आर्थिक अडचणींचाही सामना करत आहेत.
