आयपीएल २०२६ चा हंगाम एकापेक्षा एक थरारक सामन्यांसह पुढे सरकत आहे. आरसीबीचा संघ वगळता इतर सर्व संघांनी स्पर्धेतील प्रत्येकी तीन सामने खेळले आहेत. पण या सर्व सामन्यांमध्ये संघांनी घेतलेल्या महागड्या खेळाडूंना मात्र निराश केलं आहे. आयपीएल २०२६ मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या पहिल्या १० खेळाडूंची एकूण रक्कम तब्बल १२५.२० कोटी रुपये आहे. जर आपण उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ७.२० कोटींच्या किमतीला विकत घेतलेल्या बिश्नोईला वगळलं, तर उर्वरित पहिल्या १० खेळाडूंना ११८ कोटी रुपयांना विकत घेण्यात आलं होतं आणि या नऊही खेळाडूंनी अजूनही साजेशी कामगिरी केलेली नाही.
आयपीएलच्या सुरूवातीला खेळाडू फेल ठरले असले तरी मोठ्या स्पर्धेत परिस्थिती कधीही बदलू शकते. तरी आतापर्यंतचा कल असा पाहता २०२६ च्या लिलावातील बहुतांश महागडे खेळाडू अजून आपल्या पूर्ण क्षमतेनुसार खेळू शकलेले नाहीत. राजस्थान रॉयल्सचा फिरकी गोलंदाज रवी बिश्नोई याने मात्र आपल्या कमालीच्या कामगिरीने प्रभाव पाडला आहे, पण इतर अनेक खेळाडूंनी अजून आपली खरी ताकद दाखवायची आहे.
१. कॅमेरून ग्रीन (सर्वात महागडा खेळाडू २५.२० कोटी)
कोलकाता नाईट रायडर्सने २०२६ च्या आयपीएल हंगामातील सर्वात महागडा खेळाडू खरेदी केली. ऑस्ट्रेलियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू कॅमेरून ग्रीनला २५.२० कोटींना केकेआरने लिलावात खरेदी केलं. केकेआरसाठी ग्रीनने चौथ्या सामन्यात गोलंदाजी करू शकला, दुखापतीमुळे त्याला गोलंदाजी करण्यासाठी ऑस्ट्रेलियाकडून हिरवा कंदील मिळाला नव्हता. ग्रीनने या सामन्यात २ षटकांत १ विकेट घेत २८ धावा दिल्या. तर त्याने तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करत ४ सामन्यांमध्ये १८.६७ च्या सरासरीने फक्त ५६ धावा केल्या आहेत.
२. मथीशा पथिराना – (केकेआर-१८ कोटी)
टी-२० विश्वचषकादरम्यान पोटरीला दुखापत झालेला मथिशा पथिराना अद्याप दुखापतीतून सावरला नाहीये. त्यामुळे तो संघात परतू शकलेला नाही. तो सराव करत असला तरी पुनरागमनाची तारीख अद्याप निश्चित नाही.
३. कार्तिक शर्मा – (चेन्नई सुपर किंग्स – १४.२० कोटी)
चेन्नईने या युवा फलंदाजावर मोठी बोली लावत संघात सामील केलं होतं. पण त्याने तीन सामन्यांत १८, १ आणि ६ अशा धावा केल्या असून अजून मोठी खेळी करता आलेली नाही.
४. प्रशांत वीर – (चेन्नई सुपर किंग्स – १४.२० कोटी)
आरसीबीविरुद्ध ४३ धावांची आशादायक खेळी सोडली तर इतर सामन्यांत अष्टपैलू खेळाडू प्रशांत वीर विशेष छाप पाडू शकलेला नाही.
५. लियाम लिव्हिंगस्टोन (सनरायझर्स हैदराबाद-१३ कोटी)
हैदराबाद संघाचा हा अष्टपैलू फिरकीपटू आतापर्यंत एकच सामना खेळला असून त्यात फक्त तो १४ धावा करण्यात यशस्वी ठरला.
६. मुस्तफिजूर रहमान (केकेआर-९.२० कोटी)
केकेआरने विकत घेतलेला तिसरा महागडा खेळाडू स्पर्धेपूर्वीच बीसीसीआयच्या सुचनांमुळे स्पर्धेबाहेर झाला.
७. जोश इंग्लिस (लखनौ सुपर जायंट्स – ८.६० कोटी)
जोश इंग्लिस लग्नबंधनात अडकणार असून स्पर्धेचा सुरूवातीचा टप्पा खेळणार नसल्याची माहिती त्याने सुरूवातीलाच दिली होती. त्यामुळे तो अद्याप संघात सामील झालेला नाही.
८. आकिब नबी (दिल्ली कॅपिटल्स-८.४० कोटी)
देशांतर्गत क्रिकेटमध्ये आणि रणजी ट्रॉफी स्पर्धेत आपल्या गोलंदाजीने हाहाकार माजवणाऱ्या जम्मू-काश्मीरच्या आकिब नबीला ८.४० कोटींना दिल्लीत ताफ्यात सामील केलं, पण त्याला एकही सामना खेळण्याची संधी दिलेली नाही.
९. रवी बिश्नोई (राजस्थान रॉयल्स – ७.२० कोटी)
आयपीएल २०२६ मधील सर्वात महागड्या खेळाडूंमध्ये यशस्वी ठरलेला खेळाडू रवी बिश्नोई आहे. ज्याने तीन सामन्यांत ७ विकेट्स घेत सर्वाेत्कृष्ट कामगिरी केली आहे. यासह पर्पल कॅपदेखील रवी बिश्नोईकडे आहे.
१०. जेसन होल्डर (गुजरात टायटन्स-७.२० कोटी)
वेस्ट इंडिजच्या या अष्टपैलू खेळाडूला गुजरातने अद्याप एककही सामना खेळण्याची संधी दिलेली नाही.
