Gujarat Titans vs Mumbai Indians: आयपीएल २०२६ स्पर्धेतील ३० वा सामना मुंबई इंडियन्स विरूद्ध गुजरात टायटन्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाला पराभूत केल्यानंतर पुढील सर्व सामन्यांमध्ये मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला आहे. पण गुजरात टायटन्स संघाविरूद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी आणि फलंदाजांनी दमदार कामगिरी केली.पहिल्या डावात तिलक वर्माने शतक झळकावून संघाची धावसंख्या १९९ धावांवर पोहोचवली. त्यानंतर धावांचा बचाव करताना युवा गोलंदाज अश्वनी कुमारने दमदार गोलंदाजी करुन मुंबईला या हंगामातील दुसरा विजय मिळवून दिला.

मुंबई इंडियन्सला हा सामना जिंकण्यासाठी २०० धावांचा डोंगर सर करायचा होता. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या गुजरातला पहिल्याच चेंडूवर मोठा धक्का बसला. मुंबईकडून जसप्रीत बुमराह पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाजीला आला. त्याने पहिल्याच चेंडूवर साई सुदर्शनला गोल्डन डकवर माघारी धाडलं. त्यानंतर हार्दिक पंड्याने जोस बटलरला बाद केलं. त्यानंतर कर्णधार शुबमन गिल अवघ्या १४ धावा करून माघारी परतला. वॉशिंग्टन सुंदरने २६ धावांची खेळी केली. तर शाहरुख खानने १७ आणि कगिसो रबाडाने १२ धावांचे योगदान दिले. पण गुजरातचा डाव अवघ्या १०० धावांवर आटोपला. मुंबईने हा सामना ९९ धावांनी आपल्या नावावर केला.

तिलक वर्माचं शतक

मुंबई इंडियन्सचा संघ नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आला होता.मुंबईला पावरप्लेमध्ये हवी तशी सुरुवात करता आली नव्हती. सूर्यकुमार यादव, क्विंटन डीकॉक आणि दानिश मालेवार स्वस्तात माघारी परतले. त्यानंतर नमन धीर आणि तिलक वर्माने मिळून संघाचा डाव सावरला. दोघांनी मिळून महत्वपूर्ण भागीदारी केली. हार्दिक १५ धावा करून माघारी परतला. तर तिलक वर्मा शेवटपर्यंत उभा राहिला. त्याने ४५ चेंडूंमध्ये नाबाद १०१ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर मुंबई इंडियन्सने ५ गडी बाद १९९ धावा केल्या.

या सामन्याआधी मुंबई इंडियन्सचा संघ गुणतालिकेत सर्वात शेवटी होता. पण हा सामना जिंकून मंबई इंडियन्सने गुणतालिकेत ४ गुणांसह सातव्या स्थानी झेप घेतली आहे. हा विजय मुंबई इंडियन्ससाठी खास आहे. कारण मुंबईचा संघ गुजरातला त्यांच्या होम ग्राऊंडवर पराभूत करू शकला नव्हता. आता पहिल्यांदाच मोठ्या विजयाची नोंद केली आहे.