K. Srikkanth On Mumbai Indians: आयपीएल २०२६ स्पर्धेत मुंबई इंडियन्सला हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. पहिल्या सामन्यात मुंबईने कोलकाता नाईट रायडर्सवर विजय मिळवला होता. त्यानंतर पुढील सर्व सामन्यांमध्ये मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला आहे. ५ वेळचा चॅम्पियन मुंबई इंडियन्स संघ एक विजयासाठी संघर्ष करताना दिसून येत आहे. त्यामुळे कर्णधार हार्दिक पंड्या आणि संपूर्ण संघावर जोरदार टीका होत आहे. दरम्यान माजी भारतीय क्रिकेटपटू के श्रीकांत यांनी देखील मुंबई इंडियन्सवर जोरदार टीका केली आहे. यासह एक सल्ला देखील दिला आहे.
मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने १९५ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना पंजाब किंग्जने सहज विजय मिळवला.
या सामन्यानंतर आपल्या युट्यूब चॅनलवर बोलताना के श्रीकांत म्हणाले, “मला एक कळत नाही, मुंबई इंडियन्स दीपक चहरला प्लेईंग ११ मध्ये स्थान का देत आहे? त्याला रिटेन तरी का केलं? पहिल्या षटकात गोलंदाजी करताना त्याने २१ धावा खर्च केल्या. गेल्या सामन्यात २२ धावा खर्च केल्या. २.३ षटकात ४५ धावा खर्च केल्या. सर शार्दुल ठाकूरने ३ षटकात ४२ धावा खर्च केल्या. दोघांनी ५.३ षटक गोलंदाजी केली आणि ८७ धावा खर्च केल्या.”
तसेच ते पुढे म्हणाले की, “जर तुमचे प्रमुख गोलंदाज ५.३ षटकात ८७ धावा खर्च करत असतील, तर तुम्ही सामना कसा जिंकणार? तुम्ही दोघांना प्लेईंग ११ मध्ये का खेळवताय? मी प्री मॅच शोमध्येही हेच म्हटलं होतं. तुम्ही त्यांना पैसे द्या आणि घरी पाठवा आणि परत येऊ नका अशी विनंती करा. त्यांना सांगा, जेव्हा गरज असेल तेव्हा परत बोलवू. तुम्ही हे नक्कीच करू शकता, यात काहीच चुकीचं नाही.”
मुंबई इंडियन्सने १९५ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना प्रियांश आर्यने १५ धावा केल्या. तर कुपर कॉनोलीने १७ धावा केल्या. प्रभसिमरन सिंगने नाबाद ८० धावांची खेळी केली. तर श्रेयस अय्यरने ६६ धावांची खेळी करून पंजाबला ७ गडी राखून विजय मिळवून दिला.
