MI vs PBKS, Rohit Sharma Injury Update: हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळत असलेल्या मुंबई इंडियन्सला आयपीएल २०२६ स्पर्धेत हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. पहिल्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर मुंबईला पुढील सर्व सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. संघ अडचणीत असताना आणखी एक टेन्शन वाढवणारी बातमी समोर येत आहे. संघातील अनुभवी सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा पुढील सामन्यातून बाहेर होऊ शकतो. १६ एप्रिलला मुंबई इंडियन्सचा सामना पंजाब किंग्ज संघाविरूद्ध होणार आहे. या सामन्यात रोहित शर्मा खेळणार की नाही, याबाबत अधिकृत माहिती समोर आली आहे.

दुखापतीने टेन्शन वाढवलं

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात फलंदाजी करत असताना, रोहितला हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे मैदान सोडून बाहेर जावं लागलं होतं. धावांचा पाठलाग करताना ६ व्या षटकात तो रिटायर्ड हर्ट होऊन मैदानाबाहेर गेला होता.

पंजाब किंग्ज संघाविरूद्ध होणाऱ्या सामन्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत नमन धीरने रोहित शर्मा खेळणार की नाही? याबाबत अपडेट दिली आहे. नमन धीर म्हणाला, “वैद्यकीय पथक त्याची तपासणी करत आहे. अधिकृत माहिती उपलब्ध झाल्यावर दिली जाईल.” संध्याकाळी उशिरा झालेल्या संघाच्या सराव सत्रादरम्यान रोहित वानखेडे स्टेडियमवर जॉगिंग करताना दिसला. त्यामुळे रोहित खेळणार की नाही, हे अजूनही स्पष्ट होऊ शकलेलं नाही.

रोहित शर्माने या स्पर्धेतील ४ सामन्यांमध्ये १३७ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्या ने ४५.६७ च्या सरासरीने धावा केल्या आहेत. कोलकाता नाईट रायडर्स संघाविरूद्ध झालेल्या पहिल्याच सामन्यात त्याने ७८ धावांची दमदार खेळी केली होती. मुंबई इंडियन्सला या हंगामात आतापर्यंत तरी हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. मुंबईने आतापर्यंत ४ सामने खेळले आहेत. त्यापैकी ३ सामन्यांमध्ये या संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. २ गुणांसह मुंबईचा संघ गुणतालिकेत नवव्या स्थानी आहे. मुंबई इंडियन्सच्या खाली कोलकाता नाईट रायडर्सचा संघ आहे. कोलकाताने आतापर्यंत केवळ १ गुणाची कमाई केली आहे. घरच्या मैदानावर मुंबईचा संघ दुसरा विजय मिळवण्याच्या प्रयत्नात असणार आहे.