वृत्तसंस्था, बंगळूरु हैदराबाद
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या बहुप्रतीक्षित १९व्या हंगामाला आज, शनिवारपासून प्रारंभ होणार असून यावेळी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज हे संघ गतवैभव परत मिळवणारा का, याकडे चाहत्यांचे लक्ष असेल. गतवर्षी रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु संघाने आपल्या पहिल्या ‘आयपीएल’ जेतेपदाची प्रतीक्षा संपवली होती. मात्र, आता त्यांना चषक राखणे अवघड जाईल असे मानले जात आहे. तसेच कागदावर तगडे वाटणारे पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांसारखे संघ प्रथमच ‘आयपीएल’ विजेत्याचा मान मिळविण्यास प्रयत्नशील असतील. त्यामुळे यंदाची स्पर्धा अतिशय चुरशीची होणे अपेक्षित आहे.
सलामीच्या लढतीत बंगळूरुची गाठ सनरायजर्स हैदराबादशी पडणार आहे. या सामन्याची आणि यंदाच्या स्पर्धेची सुरुवात भावनिक पार्श्वभूमीत होत आहे. गतवर्षी बंगळूरु संघाच्या पहिल्या जेतेपदाच्या जल्लोष सोहळ्यावेळी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाला होता. ही दुर्दैवी घटना अजूनही सर्वांच्या मनात ताजी असताना याच मैदानात सलामीची लढत होणार आहे. कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना आणि बंगळूरुच्या संघ व्यवस्थापनाने स्टेडियममधील ११ जागा कायम रिकाम्या ठेवण्याचा निर्णय घेतला असून, खेळाडूही विशेष ११ क्रमांक असलेल्या जर्सीद्वारे आदरांजली अर्पण करणार आहेत. या पार्श्वभूमीवर, केवळ खेळावर लक्ष केंद्रित करणे बंगळूरु संघाला अवघड जाऊ शकेल.
गोलंदाजीची चिंता
सलामीच्या लढतीत आमनेसामने येणाऱ्या बंगळूरु आणि हैदराबाद संघांत तडाखेबंद फलंदाजांचा भरणा आहे. बंगळूरुकडे विराट कोहली, टीम डेव्हिड, फिल सॉल्ट, कर्णधार रजत पाटीदार, रोमारियो शेफर्ड, तर हैदराबादकडे ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, इशान किशन, हेन्रिक क्लासन यांसारखे दमदार फलंदाज आहेत. परंतु गोलंदाजी हा दोन्ही संघांसाठी चिंतेचा विषय ठरू शकेल. बंगळूरुला जोश हेझलवूड आणि यश दयाल यांच्याविना खेळावे लागणार आहे. त्यामुळे भुवनेश्वर कुमार, कृणाल पांड्या, सुयश शर्मा आणि मंगेश यादव यांच्यावर जबाबदारी असेल. हैदराबादचा संघही हंगामाची सुरुवात कर्णधार आणि प्रमुख वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सविना करेल. त्याच्या अनुपस्थितीत इशान किशन नेतृत्वाची धुरा सांभाळणार आहे.
आघाडीच्या संघांचे वर्चस्व?
मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स या संघांनी मिळून १३ ‘आयपीएल’ विजेतेपदे जिंकली आहेत. मात्र, गेला हंगाम त्यांच्यासाठी निराशाजनक ठरला. यंदा हे संघ दमदार पुनरागमनाच्या प्रयत्नात असतील. चेन्नईने संजू सॅमसनला संघात सामील केले असून त्यांच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत. कोलकात्याने टीम सेफर्ट, फिन ॲलन, रचिन रवींद्र आणि कॅमरून ग्रीन यांना घेत फलंदाजी मजबूत केली आहे. मुंबई संघ २०२० सालानंतर जेतेपद मिळवून शकलेला नाही. यंदा हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील हा संघ सर्वांत परिपूर्ण दिसत आहे. मुंबईकडे रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमरा, तिलक वर्मा असे दर्जेदार भारतीय, तसेच क्विंटन डिकॉक आणि ट्रेंट बोल्टसारखे उत्कृष्ट परदेशी खेळाडू आहेत. त्यामुळे यंदा जेतेपदासाठी मुंबईला प्रमुख दावेदार मानले जात आहे.
दिग्गजांसह युवकांकडेही लक्ष
दोन महिने चालणाऱ्या क्रिकेटोत्सवात रोहित शर्मा, विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनी हे दिग्गज आपला लौकिक राखण्याचा प्रयत्न करतील, तर वैभव सूर्यवंशी, आयुष म्हात्रे यांसारखे युवा तारे आपली प्रतिभा अधोरेखित करण्याचे ध्येय बाळगून असतील. कोहलीने गेल्या वर्षी ‘आयपीएल’ विजेतेपदाचे स्वप्न अखेर पूर्ण केले. आता तो आपली तीच तीव्रता कायम ठेवतो का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. रोहितही तंदुरुस्ती आणि लय सिद्ध करण्यासाठी उत्सुक असेल. तसेच धोनीचा हा अखेरचा हंगाम ठरतो का, याकडेही चाहते लक्ष ठेवून असतील.
दोन मराठमोळे, दोन मुंबईकर, सर्व दहा भारतीय कर्णधार
यंदाच्या ‘आयपीएल’ स्पर्धेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. यंदा प्रथमच स्पर्धेतील सर्व दहा संघांचे कर्णधार भारतीय असणार आहे. यात दोन मराठमोळ्या (अजिंक्य रहाणे, ऋतुराज गायकवाड) आणि दोन मुंबईकर (रहाणे, श्रेयस अय्यर) कर्णधारांचाही समावेश आहे. सनरायजर्स हैदराबादचे कर्णधारपद ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सकडे कायम असले, तरी तो सुरुवातीच्या सामन्यांना मुकणार आहे. त्याच्या अनुपस्थितीत इशान किशन या संघाचे नेतृत्व करेल.
सलामीची लढत
- वेळ : सायं. ७.३० वा.
- थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्टस १, २, २ हिंदी, जिओहॉटस्टार ॲप
