Punjab Kings vs Lucknow Super Giants: श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळत असलेल्या पंजाब किंग्ज संघाने लागोपाठ पाचव्या विजयाची नोंद केली आहे. स्पर्धेतील २९ वा सामना पंजाब किंग्ज आणि लखनौ सुपर जायंट्स या दोन्ही संघांमध्ये पार पडलेल्या सामन्यात पंजाब किंग्ज संघाने पहिल्या डावात ७ गडी बाद २५४ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना लखनौला २०० धावांपर्यंत मजल मारता आली. यासह पंजाब किंग्जने हा सामना ५४ धावांनी आपल्या नावावर केला.
पंजाब किंग्जने आयपीएल २०२६ स्पर्धेतील सर्वोत्तम धावसंख्या उभारली होती. त्यामुळे लखनौ सुपर जायंट्सला हा सामना जिंकण्यासाठी इतिहास घडवायचा होता. पण कुठलाही फलंदाज प्रियांश आर्य आणि कुपर कॉनोलीसारखी मोठी खेळी करु शकला नाही. सलामीला आलेल्या मिचेल मार्श आणि आयुष बदोनीने ६१ धावांची खेळी केली. मिचेल मार्शने २८ चेंडूत ४० धावांची खेळी केली.
तर आयुष बदोनीने २१ चेंडूत ३५ धावांची खेळी केली. तर कर्णधार ऋषभ पंतने हातभार लावत २३ चेंडूत ४३ धावांची खेळी केली. पंतने या खेळीदरम्यान ६ षटकार मारले. निकोलस पूरनकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. पण तो अवघ्या ९ धावा करुन माघारी परतला. शेवटी एडेन मारक्रमने ४२ धावांची खेळी केली. तर मुकुल चौधरीने नाबाद २१ धावांची खेळी केली. लखनौचा संघ विजयापासून ५४ धावा दूर राहिला.
पंजाबने उभारला २५६ धावा
लखनौ सुपर जायंट्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या पंजाब किंग्जला सुरुवातीला मोठा धक्का बसला. सलामीवीर फलंदाज प्रभसिमरन सिंग शून्यावर माघारी परतला. त्यानंतर प्रियांश आर्य आणि कुपर कॉनोलीने दमदार सुरुवात करून दिली. दोघांनी मिळून दुसऱ्या विकेटसाठी १८५ धावांची भागीदारी केली. दोघांनाही शतक झळकवण्याची संधी होती. पण त्यांनी आपल्या शतकाचा विचार न करता फटकेबाजी सुरूच ठेवली. या प्रयत्नात दोघेही बाद झाले. प्रियांश आर्य ९३ धावांवर बाद झाला. तर कुपर कॉनोलीने ७ षटकारांचा साहाय्याने ८७ धावांची खेळी केली. शेवटी फलंदाजी करताना मार्कस स्टोइनिसने २९ धावांची खेळी केली. तर नेहाल वढेराने १३, शशांक सिंगने १७ धावांची खेळी केली.
