IPL 2026 Playoff Qualification for All Teams: आयपीएल २०२६ चा हंगाम आता प्लेऑफच्या शर्यतीच्या दिशेने वळत आहे. त्यामुळे प्लेऑफची शर्यत चांगलीच रंगतदार झाली आहे. प्रत्येक सामन्यानुसार प्लेऑफचं गणित बदलताना दिसत आहे. साखळी फेरीअखेर गुणतालिकेतील अव्वल चार संघ प्लेऑफसाठी पात्र ठरणार आहेत. १४ सामने पूर्ण झाल्यानंतर दोन संघांचे गुण समान असतील, तर नेट रनरेटच्या आधारे क्रमवारी ठरवली जाईल. प्रत्येक संघासाठी प्लेऑफचं समीकरण कसं आहे, जाणून घेऊया.

सध्या ४८ सामन्यांनंतर आयपीएल २०१६ विजेते सनरायझर्स हैदराबाद, पंजाब किंग्ज, गतविजेते रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स हे संघ गुणतालिकेतील पहिल्या चार स्थानांवर आहेत. मात्र, अद्याप कोणत्याही संघाने अधिकृतपणे प्लेऑफमधील स्थान निश्चित केलेलं नाही. दुसरीकडे, लखनौ सुपर जायंट्सची परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. नऊ सामन्यांत केवळ दोन विजयांसह हा संघ गुणतालिकेच्या तळाशी असून, प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडणारा पहिला संघ ठरण्याचा धोका त्यांच्यावर आहे.

IPL 2026 playoffs qualification scenarios

सनरायझर्स हैदराबाद संघाचे १४ गुण असून त्यांना प्लेऑफ गाठण्यासाठी एक सामना जिंकण्याची गरज आहे. तर पंजाब किंग्स संघ १३ गुणांवर असून त्यांना ४ पैकी २ सामने जिंकायचे आहेत. तर आरसीबी व राजस्थान या संघांचे १२ समान गुण आहेत, त्या दोघांनाही उर्वरित ४ सामन्यांपैकी २ सामने जिंकावे लागतील. आता उर्वरित ६ संघांचं प्लेऑफ समीकरण जाणून घेऊया.

गुजरात टायटन्स

गुजरात टायटन्सचा संघ १० सामन्यांनंतर १२ गुणांसह पाचव्या स्थानी आहे. संघाला प्लेऑफ गाठण्यासाठी ४ पैकी २ सामने सामने जिंकवाे लागणार आहे. तर संघाचा नेट रन रेट ऋणमध्ये आहे.

चेन्नई सुपर किंग्स

चेन्नई सुपर किंग्सचा संघ १० सामन्यांनंतर १० गुणांवर आहे. आता संघाला प्लेऑफ गाठण्यासाठी ४ पैकी ३ सामने जिंकायचे आहेत.

कोलकाता नाईट रायडर्स

कोलकाता नाईट रायडर्सने सलग ४ सामने जिंकले आहेत, त्यामुळे संघ प्लेऑफच्या शर्यतीत कायम आहे. कोलकाताचा संघ ९ गुणांसह सातव्या स्थानी आहे, यासह संघाला ४ पैकी ४ सामने संघाला जिंकायचे आहेत.

दिल्ली कॅपिटल्स

दिल्ली कॅपिटल्सने प्लेऑफच्या शर्यतीत कायम असून ११ सामन्यांनंतर संघाचे ८ गुण आहेत. आता संघाला प्लेऑफ गाठण्यासाठी उर्वरित ३ सामने मोठ्या फरकाने जिंकायचे आहेत. १४ गुणांसह संघ प्लेऑफच्या शर्यतीत राहू शकतो, पण इतर संघांचे निकालही त्यांच्या बाजूने लागण्याची त्यांना आशा करावी लागणार आहे.

मुंबई इंडियन्स

मुंबई इंडियन्सचा संघ १० सामन्यांमध्ये ६ गुणांसह नवव्या स्थानी आहे. संघाला आता उर्वरित ४ सामन्यांपैकी चारही सामने मोठ्या फरकाने जिंकायचे आहेत. संघाने एकही सामना गमावल्यास त्यांना स्पर्धेबाहेर होण्याचा धोका आहे.

लखनौ सुपर जायंट्स

लखनौ सुपर जायंट्सचा संघ ६ गुणांवर असून त्यांना चारही सामने जिंकायचे आहेत, एक चूकदेखील त्यांना महागात पडू शकते.