KSCA Reaction On BCCI Decision: आयपीएल २०२६ स्पर्धा सध्या शेवटच्या टप्प्यात आहे. स्पर्धेतील पहिल्या टप्प्यातील सामने पूर्ण झाले असून आता सर्व संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याच्या प्रयत्नात आहेत. बीसीसीआयकडून टप्प्या टप्प्याने साखळी फेरीतील सामन्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. पण प्लेऑफचे सामने आणि अंतिम फेरीतील सामना केव्हा आणि कुठे होणार हे जाहीर करण्यात आलं नव्हतं. अखेर ६ मे ला बीसीसीआयकडून प्लेऑफ आणि फायनल सामन्याचे वेळापत्रक आणि सामन्याचे ठिकाण जाहीर करण्यात आले आहे.
गतवर्षी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने पंजाब किंग्जला पराभूत करून जेतेपदाचा मान पटकावला होता. त्यामुळे यंदाचा अंतिम सामना बंगळुरूतील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार अशी चर्चा होती. पण बीसीसीआयकडून जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या निर्णयावरून कर्नाटक क्रिकेट असोसिएशनकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
आयपीएलच्या प्लेऑफच्या आणि अंतिम सामन्याचे वेळापत्रक केव्हा जाहीर होणार? अशी सर्वत्र चर्चा रंगली होती. कर्नाटक क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि माजी भारतीय खेळाडू वेंकटेश प्रसाद बीसीसीआयच्या संपर्कात होते. वेंकटेश प्रसाद यांनी दिलेल्या अधिकृत माहितीत हे स्पष्ट केलं आहे की, ते बीसीसीआयच्या संपर्कात होते. ते म्हणाले, “एम चिन्नास्वामी स्टेडियमवर आयपीएलचे प्लेऑफचे सामने आयोजित करण्याच्या आमच्या तयारीबद्दल आम्ही बीसीसीआयला औपचारिक माहिती दिली होती. आम्ही साखळी फेरीतील सामन्यांचे व्यवस्थितपणे आयोजन केले. त्यामुळे मोठ्या सामन्यांचे आयोजन करण्याचा आमचा दावा आणखी बळकट झाला.”
तसेच ते पुढे म्हणाले की, “आम्हाला समजले की, बीसीसीआयने प्लेऑफचे सामने दुसऱ्या ठिकाणी हलवण्याचा निर्णय घेतला आहे. यामागचं कारण काय याबाबत कर्नाटक क्रिकेट असोसिएशनला कुठलीही कल्पना देण्यात आलेली नाही. तरीही आम्ही बीसीसीआयच्या निर्णयाचा आदर करतो.” गतविजेत्या संघाला प्लेऑफ किंवा अंतिम सामन्याचे आयोजन करण्याचा मान दिला जातो. पण यावेळी असं काही झालेलं नाही. गेल्यावेळी आयपीएलचा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडला होता. पण रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विजयाचा जल्लोष चिन्नास्वामी स्टेडियमवर पार पडला होता. यादरम्यान चेंगराचेंगरी झाली होती. ज्यात ११ क्रिकेट चाहत्यांना आपला जीव गमवावा लागला होता.
