KKR Playoffs Scenario: आयपीएल २०२६ स्पर्धेतील ६५ वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. कोलकात्यातील इडन गार्डन्सच्या मैदानावर पार पडलेल्या या सामन्यात कोलकाताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या मुंबईला १४७ धावांपर्यंत मजल मारता आली. हे आव्हान कोलकाता नाईट रायडर्स संघाने ४ गडी राखून पूर्ण केलं आणि दमदार विजयाची नोंद केली आहे. त्यामुळे कोलकाता नाईट रायडर्सचा प्लेऑफमध्ये जाण्याचा मार्ग अजूनही मोकळा आहे. दरम्यान कसं आहे समीकरण? जाणून घ्या.
कसं आहे समीकरण?
आयपीएलमध्ये सर्वच संघांचे १३ सामने पूर्ण झाले आहेत. कोलकाता नाईट रायडर्स संघाचे देखील १३ सामने पूर्ण झाले आहेत. सध्या हा संघ गुणतालिकेत ६ व्या स्थानी आहे. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सने ६ सामने जिंकले आहेत. तर ६ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. यादरम्यान १ सामना पावसामुळे रद्द झाला होता.
जर कोलकाता नाईट रायडर्स संघाला आयपीएल २०२६ स्पर्धेतील प्लेऑफमध्ये प्रवेश करायचा असेल, तर त्यांना आपल्या शेवटच्या सामन्यात विजय मिळवणं गरजेचं असणार आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघाचा साखळी फेरीतील शेवटचा सामना २४ मे ला दिल्ली कॅपिटल्स संघाविरुद्ध होणार आहे. असं झाल्यास हा संघ १५ गुणांपर्यंत पोहोचू शकतो. हा सामना जिंकण्यासह राजस्थानला प्रार्थना करावी लागेल की, पंजाब किंग्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांचा शेवटच्या सामन्यात पराभव व्हायला हवा.
पंजाब किंग्स संघाने आपल्या शेवटच्या सामन्यात विजय मिळवला, तरीदेखील कोलकाता नाईट रायडर्स संघाकडे प्लेऑफमध्ये जाण्याची संधी असणार आहे . कारण हा सामना जिंकून पंजाबचा संघ १५ गुणांपर्यंत पोहोचू शकतो. तर राजस्थानचा संघ देखील शेवटचा सामना जिंकून १६ गुणांपर्यंत पोहोचू शकतो. अशा स्थितीत नेट रनरेट महत्वाचा ठरेल. कोलकाताला शेवटच्या सामन्यात विजय मिळवण्याचा नेट रनरेटवरही लक्ष द्यावं लागेल. यासह राजस्थान रॉयल्सच्या पराभवाची प्रार्थना करावी लागेल.
