IPL 2026 Playoffs Scenario: आयपीएल २०२६ स्पर्धेतील ३९ सामने पूर्ण झाले आहेत. स्पर्धेतील ३९ वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिल्ली कॅपिटल्सवर एकतर्फी विजयाची नोंद केली. या विजयासह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. तर पंजाबचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. ३९ सामन्यानंतर २ संघ प्लेऑफमध्ये जाणार हे जगळजवळ निश्चित झालं आहे. दरम्यान उर्वरित २ स्थानांसाठी ८ संघांमध्ये चुरशीची लढत सुरू आहे. कोणता संघ प्लेऑफमध्ये जाणार? जाणून घ्या.
या हंगामात पंजाब किंग्ज संघाने ज्या पद्धतीने खेळ केला आहे, ते पाहता पंजाबचा संघ प्लेऑफमध्ये जाणार हे निश्चित आहे. तर गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे. आतापर्यंत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने ज्या पद्धतीने खेळ केला आहे, ते पाहता हा संघ देखील प्लेऑफसाठी पात्र ठरू शकतो.
या ४ संघांकडे प्लेऑफमध्ये जाण्याची संधी
१) पंजाब किंग्ज:
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळत असलेल्या पंजाब किंग्ज संघाने आतापर्यंत ७ सामने खेळले असून १३ गुणांची कमाई केली आहे. एक सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. +१.३३३ नेट रनरेटसह पंजाबचा संघ अव्वल स्थानी आहे.
२) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू:
रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली खेळत असलेला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आतापर्यंत ८ सामने खेळले असून २ सामने गमावले आहेत. १२ गुणांसह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडे प्लेऑफमध्ये जाण्याची नामी संधी आहे.
३) सनरायझर्स हैदराबाद:
सनरायझर्स हैदराबादने ८ पैकी ५ सामने जिंकले आहेत. १० गुणांसह हैदराबादचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी आहे. हैदराबादचा नेट रनरेट +०.८१५ इतका आहे. हैदराबादची कामगिरी पाहता, पुढील ३ सामने जिंकून हा संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करू शकतो.
राजस्थान रॉयल्सने देखील आतापर्यंत ८ पैकी ५ सामने जिंकले आहेत. १० गुणांसह हा संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानी आहे. राजस्थानला प्लेऑफमध्ये जाण्यासाठी ६ पैकी ३ सामने जिंकावे लागणार आहेत.
