आयपीएल २०२६ स्पर्धेत मुंबई इंडियन्सचा सुपर फ्लॉप शो पाहायला मिळाला आहे. गोलंदाजी असो किंवा फलंदाजी, मुंबईचा संघ कुठेतरी कमी पडताना दिसून येत आहे. बुधवारी वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. यादरम्यान मुंबईने २४३ धावांचा भलामोठा डोंगर उभारला होता. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या हैदराबादने हे आव्हान १८.४ षटकात पूर्ण केलं आणि विजय मिळवला. दरम्यान या विजयानंतर मुंबई इंडियन्स संघाचं या स्पर्धेतील आव्हान जवळजवळ संपुष्टात आलं आहे. दरम्यान गुणतालिकेत कोणता संघ कितव्या स्थानी आहे? जाणून घ्या.

जवळपास सर्व संघांचे प्रत्येकी ८-८ सामने खेळून झाले आहेत. इथून पुढे प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी आता सर्व संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. मुंबईचा संघ अधिकृतरित्या प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर झालेला नाही, पण इथून प्लेऑफमध्ये स्थान मिळवणं खूप कठीण आहे. मुंबईने आतापर्यंत ८ सामने खेळले असून केवळ २ सामने जिंकले आहेत. तर ६ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. मुंबईचा संघ गुणतालिकेत ९ व्या स्थानी आहे. तर हैदराबादचा संघ ९ पैकी ६ सामने जिंकून १२ गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे.

या यादीत पंजाबचा संघ १३ गुणांसह अव्वल स्थानी आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने १२ गुणांची कमाई करून दुसरं स्थान गाठलं आहे. हैदराबादचा संघ १२ गुणांसह तिसऱ्या स्थानी आणि राजस्थान रॉयल्सचा संघ देखील १२ गुणांसह चौथ्या स्थानी आहे.

शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळत असलेल्या गुजरातने ४ सामने जिंकले आहेत. ८ गुणांसह हा संघ पाचव्या स्थानी आहे. तर ६ गुणांसह चेन्नईचा संघ सहाव्या स्थानी आहे. दिल्लीने देखील ३ सामने जिंकले आहेत. दिल्लीचा संघ गुणतालिकेत ६ व्या स्थानी आहे. कोलकाता नाईट रायडर्सचा संघ ५ गुणांसह आठव्या स्थानी असून लखनौचा संघ ४ गुणांसह सर्वात शेवटी आहे.

मुंबईचा पराभव

वानखेडे स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना मुंबईकडून रायन रिकल्टनने दमदार शतकी खेळी केली. या खेळीच्या बळावर मुंबईने २४३ धावांचा डोंगर उभारला. हे आव्हान हैदरबादने १८.४ षटकात गाठलं आणि विजय मिळवला.