IPL 2026 Points Table, Top 5 Batsman and Bowlers: आयपीएल २०२६ च्या २२ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने केकेआर संघावर ३२ धावांनी विजय मिळवला. हंगामातील पहिले तीन सामने गमावल्यानंतर, चेन्नई सुपर किंग्सने आता सलग दोन सामने जिंकले आहेत. या विजयामुळे चेन्नई आता गुणतालिकेत ९ व्या स्थानावरून ८ व्या स्थानावर पोहोचली आहे. केकेआर पाच सामन्यांनंतरही आपल्या पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत आहे. हा संघ केवळ एका गुणासह शेवटच्या म्हणजेच १० व्या स्थानावर आहे.

या मोसमात इंडियन प्रीमियर लीगमध्ये राजस्थान रॉयल्सचे वर्चस्व आहे. संघाने पाचपैकी चार सामने जिंकून आठ गुण मिळवले आहेत. त्यांनी आतापर्यंत फक्त एकच सामना गमावला आहे आणि यासह संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानी आहे. पंजाब किंग्सने चारपैकी तीन सामने जिंकून सात गुणांसह दुसरं स्थान पटकावलं आहे.

आरसीबी संघाने चारपैकी तीन सामने जिंकून सहा गुण मिळवले आहेत आणि संघ सध्या तिसऱ्या स्थानावर आहे. सनरायझर्स हैदराबादने पाच सामने खेळले असून केवळ दोनच सामने जिंकले आहेत. ते चार गुणांसह चौथ्या स्थानावर आहेत. गुणतालिकेत सध्याचं चित्र पाहता चार संघ ४-४ गुणांवर आहेत. नेट रन रेटच्या आधारावर विजय मिळवल्यामुळे सनरायझर्स हैदराबादने अव्वल चार संघांमध्ये स्थान मिळवले आहे. दिल्ली कॅपिटल्स पाचव्या, गुजरात टायटन्स सहाव्या आणि लखनौ सुपर जायंट्स संघ सातव्या क्रमांकावर आहेत. आपला दुसरा विजय मिळवून सीएसकेने आठव्या क्रमांकावर झेप घेतली आहे.

चेन्नई सुपर किंग्सच्या सलग दुसऱ्या विजयाने मुंबई इंडियन्सला थेट फटका बसला आहे. मुंबईनी चार सामने खेळून केवळ एकच सामना जिंकला आहे. संघ आता नवव्या स्थानावर घसरला आहे. केकेआरची परिस्थिती तर त्याहूनही वाईट आहे. या संघाने आतापर्यंत पाच सामने खेळले असून, त्यांना एकही सामना जिंकता आलेला नाही. त्यांच्याकडे एक गुण आहे, जो एक सामना रद्द झाल्यामुळे देण्यात आला होता. संघाचा नेट रन रेटसुद्धा खूपच खराब आहे.

ऑरेंज आणि पर्पल कॅप कोणाकडे?

संजू सॅमसननेही ऑरेंज कॅपच्या शर्यतीत प्रवेश केला आहे. या सामन्यात ४८ धावा करून संजू अव्वल ५ फलंदाजांमध्ये पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे. या यादीत हेनरिक क्लासेन अजूनही अव्वल स्थानी असून, इशान किशन दुसऱ्या आणि वैभव सूर्यवंशी तिसऱ्या क्रमांकावर आहे. दरम्यान, पर्पल कॅपची शर्यत खूपच रोमांचक झाली आहे. मात्र, प्रसिद्ध कृष्णा सध्या १० बळींसह अव्वल स्थानी आहे, तर अंशुल कंबोजच्या नावावरही १० बळी आहेत. प्रसिध कृष्णा सरासरीमध्ये अंशुलच्या पुढे आहे आणि त्यामुळे तो सध्या पहिल्या क्रमांकावर आहे.

ऑरेंज कॅपच्या शर्यतीतील ५ अव्वल खेळाडू

हेनरिक क्लासेन – २२४ धावा
इशान किशन – २१३ धावा
वैभव सूर्यवंशी – २०० धावा
रजत पाटीदार – १९५ धावा
संजू सॅमसन – १८५ धावा

पर्पल कॅपच्या शर्यतीतील ५ अव्वल खेळाडू

प्रसिध कृष्णा- १० विकेट्स
अंशुल कंबोज – १० विकेट्स
रवि बिश्नोई – ९ विकेट्स
जोफ्रा आर्चर – ७ विकेट्स
प्रिन्स यादव – ६ विकेट्स