IPL 2026 Points Table: आयपीएलच्या १९व्या हंगामात आतापर्यंत नऊ साखळी सामने खेळले गेले आहेत. प्रत्येक संघाचे एकेक सामने झाले आहेत. राजस्थान आणि दिल्ली या संघांनी आतापर्यंत खेळलेले दोन्ही सामने जिंकले आहेत. तर कोलकाता नाईट रायडर्स व चेन्नई सुपर किंग्स या दोन्ही संघांनी अद्याप एकही सामना जिंकलेला नाही. पाच वेळा ट्रॉफी जिंकलेले चेन्नई सुपर किंग्स व मुंबई इंडियन्स हे संघ गुणतालिकेत टॉप-५ मधूनही बाहेर झाले आहेत.
राजस्थान रॉयल्स सध्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. राजस्थान रॉयल्सने हंगामातील आपला दुसरा सामना ४ एप्रिलला गुजरात टायटन्सविरुद्ध खेळला, ज्यात त्यांनी ६ धावांनी विजय मिळवला. हा राजस्थानचा स्पर्धेतील सलग दुसरा विजय होता. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी करत २१० धावा केल्या, तर धावांचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सला केवळ २०४ धावाच करू शकला. राजस्थान रॉयल्स आता दोन सामन्यांतून चार गुणांसह आणि २.२३३ च्या नेट रन रेटसह गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे.
आयपीएल २०२६ च्या गुणतालिकेतील उर्वरित संघांमध्ये दिल्ली कॅपिटल्स दुसऱ्या स्थानी आहे. दोन सामन्यांनंतर दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स यांचे प्रत्येकी ४ गुण आहेत. दिल्ली कॅपिटल्सचा नेट रन रेट १.१७० आहे, तर तिसऱ्या स्थानी असलेल्या पंजाब किंग्सचा नेट रन रेट ०.६३७ आहे. गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, ज्यांनी या हंगामात फक्त एक सामना खेळला आहे, ते दोन गुणांसह आणि २.९०७ च्या नेट रन रेटने गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहेत.
दिल्ली कॅपिटल्सविरुद्धचा सामना गमावलेला मुंबई इंडियन्स संघ दोन सामन्यांत दोन गुणांसह आणि -०.२०६ च्या नेट रन रेटने आता गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे. मुंबईचा रन रेट ऋणमध्ये आहे. दुसऱ्या सामन्यातील पराभवाचा धक्का मुंबई इंडियन्सला गुणतालिकेत बसल्याचं दिसत आहे. याशिवाय, सनरायझर्स हैदराबाद पाचव्या स्थानावर आहे, ज्यांनी आतापर्यंत २ सामने खेळले असून एका सामन्यात विजय मिळवल्याने संघाचे २ गुण आहेत आणि त्यांचा नेट रन रेट ०.४६९ आहे.
आयपीएल २०२६च्या गुणतालिकेत, सलग दोन पराभवांनंतर गुजरात टायटन्स आता ७व्या स्थानावर असून त्यांचा नेट रन रेट -०.४२४ आहे. त्यांच्यापाठोपाठ ८व्या स्थानावर लखनौ सुपर जायंट्स, ९व्या स्थानावर कोलकाता नाइट रायडर्स आणि शेवटच्या स्थानावर चेन्नई सुपर किंग्स आहेत. यापैकी कोणत्याही संघाने अद्याप आपल्या गुणांचं खातं उघडलेलं नाही. त्यामुळे, या आयपीएल हंगामात या संघांसाठी पुढील मार्ग अजिबात सोपा असणार नाही.
