IPL 2026 Playoffs Scenario After PBKS vs RCB Match: आयपीएल २०२६ अखेरच्या टप्प्यात येऊन पोहोचला आहे. प्लेऑफच्या दृष्टीने प्रत्येक सामना महत्त्वाचा असणार आहे. आयपीएलमधील प्रत्येक गट सामन्यानंतर गुणतालिकेचं चित्र सातत्याने बदलताना दिसत आहे. यादरम्यान आता १७ मे च्या डबल हेडरमधील पहिल्या सामन्यानंतर प्लेऑफचा पहिला संघ निश्चित झाला आहे. तर यानंतर आता इतर संघांमध्ये तीन जागांसाठी चुरशीची लढत होणार आहे.
पंजाब किंग्सचा २३ धावांनी पराभव केल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ प्लेऑफ गाठणारा पहिला संघ ठरला आहे. आरसीबीने १३ पैकी ९ सामने जिंकत १८ गुणांसह प्लेऑफमध्ये धडक मारली आहे. यासह सर्वाधिक रन रेट हा आरसीबीचा आहे. या पराभवामुळे पंजाब किंग्सचं प्लेऑफ गाठण्याचं स्वप्न अधिक धुसर झालं आहे.
पंजाब किंग्ससाठी कसं आहे प्लेऑफचं समीकरण?
गुजरात टायटन्सचा संघ गुणतालिकेत १६ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे, त्यांनी अखेरचा सामना जिंकला तर प्लेऑफसाठी पात्र ठरू शकतात. याशिवाय सनरायझर्स हैदराबाद १४ गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे, त्यांचे दोन सामने शिल्लक असून प्लेऑफ गाठण्यासाठी त्यांना दोन्ही सामने जिंकायचे आहेत. तर चौथ्या स्थानी असलेल्या पंजाब किंग्सला लखनौविरूद्धचा अखेरचा सामना मोठ्या फरकाने जिंकावा लागेल, याशिवाय इतर संघांचे निकाल त्यांच्या बाजूने लागतील अशी आशा करावी लागेल. पंजाबच्या प्लेऑफच्या दृष्टीने इतर ३ संघ १५ गुणांवर राहू नये अशी प्रार्थना त्यांना करावी लागेल.
पंजाबच्या पराभवामुळे राजस्थान रॉयल्स व चेन्नई सुपर किंग्स यांचे प्लेऑफचे मार्ग मोकळे झाले आहेत. दोन्ही संघ १२-१२ गुणांवर आहेत. राजस्थानचे ३ सामने शिल्लक असून त्यांना हे तिन्ही सामने जिंकायचे आहेत. शिवाय चेन्नईचे दोन सामने शिल्लक असून त्यांनी हे दोन सामने जिंकले तर प्लेऑफसाठी क्वालिफाय होऊ शकतात. तर कोलकाता नाईट रायडर्स व दिल्ली कॅपिटल्सचे संघही शर्यतीत कायम आहेत. या संघांनी आपले उर्वरित सामने जिंकले तर इतर संघांसाठी धोकादायक ठरू शकतात.
राजस्थान रॉयल्स व दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना जर राजस्थानने जिंकला तर संघ चौथ्या स्थानी जाईल. पण दिल्लीने सामना जिंकला तर पंजाब चौथ्या स्थानी कायम असेल. पण दिल्ली जिंकल्यास १२ गुणांसह चेन्नई, राजस्थानच्या जवळ पोहोचेल. यासह प्लेऑफमधील सामने २६ मे पासून सुरू होतील, २६ मे रोजी पहिला क्वालिफायर सामना २७ मे रोजी एलिमिनेटर आणि २९ मे रोजी दुसरा क्वालिफायर सामना होईल. यानंतर ३१ मे रोजी अंतिम सामना खेळवला जाईल.
