आयपीएल २०२६ स्पर्धेतील. ५१ वा दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर पार पडला. दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही संघांमध्ये पार पडलेल्या या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने दमदार विजय मिळवला आहे. या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना कोलकाता नाईट रायडर्स संघाने २० षटकांअखेर १४२ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्स संघाने ८ गडी राखून विजय मिळवला. दरम्यान या विजयानंतर गुणतालिकेत मोठा उलटफेर झाल्याचे पाहायला मिळाले आहे.
अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळणारा कोलकाता नाईट रायडर्सचा संघ सुरुवातीला विजय मिळवण्यात संघर्ष करताना दिसून आला. सुरूवातीच्या ५ सामन्यांमध्ये लागोपाठ पराभवाचा सामना करणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्स संघाने गेल्या चारही सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. यासह ९ गुणांसह गुणतालिकेत आपलं स्थान बळकट केलं आहे. उर्वरित चारही सामने जिंकून कोलकाताचा संघ १७ गुणांसह प्लेऑफमध्ये प्रवेश करू शकतो. सध्या कोलकाता नाईट रायडर्सचा संघ गुणतालिकेत सातव्या स्थानी आहे.
तर दिल्ली कॅपिटल्सकडे हा सामना जिंकून गुणतालिकेत वर जाण्याची संधी होती. पण सामना गमावल्यामुळे दिल्लीचा संघ गुणतालिकेत आठव्या स्थानी घसरला आहे. केकेआरच्या विजयामुळे दिल्ली कॅपिटल्स, मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स संघाचं टेन्शन वाढलं आहे. कोलकाताचा संघ स्पर्धेतून बाहेर पडण्याच्या वाटेवर होता. पण आता या संघाला प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याची संधी आहे.
टॉप ४ मध्ये कोण?
सध्या सनरायझर्स हैदराबादचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. हैदराबादने ११ पैकी ७ सामने जिंकले असून १४ गुणांची कमाई केली आहे. यादीत दुसऱ्या स्थानी असलेल्या पंजाब किंग्ज संघाने १० पैकी ६ सामने जिंकले असून १३ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ १२ गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. चौथ्या स्थानी असलेल्या राजस्थान रॉयल्सने आतापर्यंत १० पैकी ६ सामने जिंकले आहेत.
