GT vs MI, IPL 2026: आयपीएल २०२६ स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सवर दमदार विजयाची नोंद केली होती. त्यानंतर झालेल्या सर्व सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सला पराभवाचा सामना करावा लागला होता. आता गुजरात टायटन्सला पराभूत करून मुंबई इंडियन्सची गाडी पुन्हा एकदा रुळावर आली आहे. या सामन्यात मुंबईने ९९ धावांनी दमदार विजय मिळवला. या सामन्याआधी मुंबईचा संघ गुणतालिकेत तळाशी होता.पण हा सामना जिंकताच मुंबईचा संघ गुणतालिकेत सातव्या स्थानी पोहोचला आहे. मुंबईच्या विजयामुळे ३ संघांना मोठा धक्का बसला आहे. दरम्यान कोणता संघ कितव्या स्थानी आहे? जाणून घ्या.
आयपीएल २०२६ स्पर्धेतील गुणतालिकेत श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळत असलेल्या पंजाब किंग्जचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. पंजाबने आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही.रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आतापर्यंत ११ गुणांची कमाई केली आहे. त्यानंतर दुसऱ्या स्थानी असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ८ गुणांची कमाई केली आहे. तर तिसऱ्या स्थानी असलेल्या राजस्थान रॉयल्सने ८ गुणांची कमाई केली. इशान किशनच्या नेतृत्वाखाली खेळत असलेला सनरायझर्स हैदराबादचा संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानी आहे.
गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्सने देखील ६-६ गुणांची कमाई केली आहे. पण नेट रनरेट काम असल्याने या दोन्ही संघांना टॉप ४ मध्ये प्रवेश करता आलेला नाही. दुसऱ्या विजयासह मुंबई इंडियन्सचा संघ थेट सातव्या क्रमांकावर जाऊन पोहोचला आहे. मुंबई सातव्या स्थानी पोहोचल्यानंतर चेन्नई सुपर किंग्ज, कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्स संघाला मोठा धक्का बसला आहे. या तिन्ही संघांचे गुण मुंबई इंडियन्सपेक्षा कमी आहेत.
या २ संघांकडे टॉप ४ मध्ये जाण्याची संधी
आयपीएल २०२६ स्पर्धेत आज होणाऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. हा सामना हैदरबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांनी आतपर्यंत ३-३ सामने जिंकले असून ६-६ गुणांची कमाई केली आहे. त्यामुळे जो संघ हा सामना जिंकणार तो ८ गुणांवर पोहोचणार आहे. त्यामुळे दोघांपैकी एका संघाला टॉप ४ मध्ये प्रवेश करण्याची संधी असणार आहे.
