IPL 2026 Points Table Update: आयपीएल २०२६ स्पर्धेला दमदार सुरुवात झाली आहे. स्पर्धेतील सर्व संघांचे जवळपास १-१ सामने पूर्ण झाले आहेत. तर गुरुवारी झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबादचा संघ आपला साखळी फेरीतील दुसरा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबाद संघाने २२६ धावांचा डोंगर उभारला होता. या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्स संघाला १६१ धावांपर्यंत मजल मारता आली. त्यामुळे कोलकाता नाईट रायडर्स संघाला हा सामना ६५ धावांचा फरकाने गमवावा लागला. दरम्यान या सामन्यानंतर गुणतालिकेत मोठा उलटफेर झाला आहे. कोणता संघ अव्वल स्थानी आहे? जाणून घ्या.
या स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे दोन संघ असे आहेत जे २ सामने खेळले आहेत. सनरायझर्स हैदराबादला पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून एकतर्फी पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे कोलकाता नाईट रायडर्स संघाला पराभूत करून हैदराबादने गुणतालिकेत खातं उघडलं आहे.
राजस्थान रॉयल्सचा संघ अव्वल स्थानी आहे. कारण त्यांचा नेट रनरेट हा इतर संघांपेक्षा चांगला आहे. त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ दुसऱ्या स्थानी आहे. दिल्ली कॅपिटल्सचा संघ तिसऱ्या स्थानी असून मुंबई इंडियन्सचा संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानी आहे. पंजाब किंग्जचा संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानी आहे. तर सनरायझर्स हैदराबादचा संघ सहाव्या स्थानी आहे.
आतापर्यंत ६ संघांनी प्रत्येकी २-२ गुणांची कमाई केली आहे. तर ४ संघ असे आहेत, ज्यांना आतापर्यंत एकही सामना जिंकता आलेला नाही. ज्यात लखनौ सुपर जायंट्स, कोलकाता नाईट रायडर्स, चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स या संघांचा समावेश आहे. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्स संघाने आतापर्यंत २ सामने खेळले आहेत. पण या दोन्ही सामन्यांमध्ये कोलकाताला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे जर स्पर्धेत टिकून राहायचं असेल, तर कोलकाताला इथून पुढे सर्व सामने जिंकणं गरजेचं असणार आहे.
