IPL 2026 Playoff Qualification Update After KKR vs GT Match: कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील शनिवारी झालेल्या सामन्यात केकेआरने विजय मिळवला. कोलकाताने ईडन गार्डन्सच्या मैदानावर २९ धावांनी विजय मिळवत गुजरातचा सलग ५ विजयांनंतरचा विजयरथ रोखला. केकेआरने प्रथम फलंदाजी करताना टॉप-३ फलंदाजांच्या बळावर २४७ धावांचा डोंगर उभारला होता. तर प्रत्युत्तरात गुजरातचा संघ फक्त २१८ धावा करण्यात यशस्वी ठरला. या विजयानंतर केकेआरला गुणतालिकेत एका स्थानाचा फायदा झाला आहे.
केकेआरच्या विजयानंतर आयपीएल २०२६ च्या गुणतालिकेत मोठा बदल झाला आहे. आयपीएल २०२६ च्या गुणतालिकेत, आरसीबी सध्या १६ गुणांसह अव्वल स्थानी आहे, तर गुजरात टायटन्सचेही १६ गुण आहेत. दरम्यान, सनरायझर्सहैदराबाद संंघ १४ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर कायम आहे. पंजाब किंग्स १३ गुणांसह चौथ्या, तर राजस्थान रॉयल्स १२ गुणांसह पाचव्या स्थानावर आहे.
KKR vs GT सामन्यानंतर कसं आहे गुणतालिकेचं चित्र?
चेन्नईचा संघ १२ गुणांसह सहाव्या स्थानावर कायम आहे. दुसरीकडे, केकेआरने एक स्थान वर येत ११ गुणांसह आता सातव्या स्थानावर झेप घेतली आहे. दिल्ली आता १० गुणांसह आठव्या स्थानावर पोहोचली आहे. मुंबई आठ गुणांसह नवव्या स्थानावर आहे, तर लखनौ आठ गुणांसह शेवटच्या स्थानावर आहे.
केकेआरच्या या विजयाचा दिल्लीसह शर्यतीत असलेल्या सर्व संघांना चांगलाच फटका बसला आहे. केकेआरचे अजून दोन सामने शिल्लक असून संघ १५ गुणांपर्यंत पोहोचू शकतो. यादरम्यान पंजाब किंग्सला जर प्लेऑफ गाठायचं असेल तर आरसीबीविरूद्धचा सामना त्यांना कोणत्याही स्थितीत जिंकावा लागेल. तरच ते शर्यतीत कायम राहू शकतील. याशिवाय दिल्लीविरूद्धचा सामना जर राजस्थानने जिंकला तर प्लेऑफची शर्यत अधिक चुरशीची होऊ शकते.
आयपीएल आता अखेरच्या टप्प्यात आली असून सर्व संघांचे १-२ सामने शिल्लक आहेत. त्यामुळे प्रत्येक सामन्यानंतर प्लेऑफचं समीकरण प्रत्येक संघासाठी बदलत जाणार आहे. सध्याच्या घडीला दोन स्थांनासाठी ६ संघ कायम आहेत. त्यामुळे प्रत्येक संघाची नजर सामना जिंकण्यावर असणार आहे.
रविवारी १७ मे रोजी दोन सामने होणार असून पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्स यांच्यात होणार आहे. तर दुसरा सामना दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात होणार आहे.
