IPL 2026 Points Table & Playoff Qualification: आयपीएल २०२६ मध्ये प्लेऑफची लढत अधिक चुरशीची झाली आहे. प्लेऑफला जाणारे २ संघ जवळपास निश्चित झाले असून उर्वरित दोन जागांसाठी घमासान सुरू आहे. आयपीएल २०२६ च्या ५९ व्या सामन्यानंतर गुणतालिकेत मोठा बदल झाला आहे. हा सामना लखनौ येथील एकना स्टेडियमवर लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात खेळला गेला. लखनौने हा सामना ७ गडी राखून जिंकून चेन्नईला मोठा धक्का दिला. त्यामुळे आता प्लेऑफच्या शर्यतीत मोठा बदल झाला आहे.
चेन्नई सुपर किंग्सला या हंगामातील सहाव्या पराभवाला सामोरं जावं लागलं. सलग तीन सामने जिंकल्यामुळे त्यांनी प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा बळकट केल्या होत्या. मात्र, या पराभवामुळे त्यांना मोठा धक्का बसला आहे. आता १२ सामन्यांमधून त्यांचे केवळ १२ गुण झाले असून, ते पाचव्या स्थानावरून सहाव्या स्थानावर घसरले आहेत. याचा तगडा फायदा राजस्थान रॉयल्सला झाला असून, तेही ११ सामन्यांमधून १२ गुणांसह सहाव्या स्थानावरून पाचव्या स्थानावर आले आहेत.
दुसरीकडे, लखनौ सुपर जायंट्सला या विजयाचा फायदा झालेला नाही. ते १० व्या स्थानावर कायम आहेत. १२ सामन्यांमधून त्यांचे आता ८ गुण झाले आहेत. मुंबई इंडियन्सचेही ८ गुण आहेत, पण नेट रन रेटमुळे मुंबई ९ व्या स्थानावर आहे. या दोन संघांव्यतिरिक्त, केकेआरनेही आतापर्यंत फक्त ४ सामने जिंकले आहेत, तर त्यांचा एक सामना पावसामुळे रद्द झाला होता, त्यामुळे ते ९ गुणांसह ८ व्या स्थानावर आहेत.
लखनौच्या बदलानंतर कोणत्या संघाचे प्लेऑफ गाठण्याची किती शक्यता आहे?
गुजरात टायटन्स व रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे दोन्ही संघ १६ गुणांसह प्लेऑफच्या उंबरठ्यावर आहेत. यानंतर हैदराबादचा संघ १४ गुणांसह तिसऱ्या स्थानी असून त्यांची प्लेऑफ गाठण्याची शक्यता ७० टक्के आहे. तर सलग पाच पराभवांनंतर चौथ्या स्थानी असलेल्या पंजाब किंग्सची प्लेऑफ गाठण्याची शक्यता ५० टक्केपेक्षा कमी असून त्यांना कोणत्याही स्थितीत उर्वरित दोन सामने मोठ्या फरकाने जिंकणं गरजेचं आहे.
लखनौच्या पराभवामुळे पाचव्या स्थानी असलेल्या राजस्थान रॉयल्सला तगडा फायदा झाला आहे. आता पंजाब किंग्सपेक्षा राजस्थान प्लेऑफ गाठण्याची शक्यता ५१ टक्के आहे. राजस्थानचे अजून ३ सामने बाकी असून तिन्ही सामने जिंकल्यास संघ प्लेऑफ गाठू शकतो. तर लखनौने केलेल्या पराभवानंतर चेन्नईची प्लेऑफ गाठण्याची शक्यता २८ टक्के आहे. संघाने उर्वरित दोन सामने जरी जिंकले तरी इतर संघांच्या निकालांवरून आणि रन रेटवर त्यांना अवलंबून राहावं लागणार आहे. तर दिल्ली आणि केकेआरची प्लेऑफ गाठण्याची शक्यता फक्त ३-३ टक्के उरली आहे. म्हणजेच आता तिसऱ्या आणि चौथ्या स्थानासाठी हैदराबाद, राजस्थान व पंजाबमध्ये चुरस असणार आहे.
