वृत्तसंस्था, जयपूर
रोहित शर्मा किंवा विराट कोहली हे त्यांच्या संघासाठी जितके महत्त्वाचे आहेत, तितकाच संजू सॅमसन राजस्थान रॉयल्ससाठी महत्त्वाचा होता. त्यामुळे त्याची जागा घेऊ शकेल असा खेळाडू मिळणे अशक्यच आहे. आम्हाला त्याची उणीव निश्चित जाणवेल, असे वक्तव्य ‘आयपीएल’ संघ राजस्थानचा नवनियुक्त कर्णधार रियान परागने केले.
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या आगामी हंगामाला २८ मार्चपासून प्रारंभ होणार आहे. हंगामापूर्वी राजस्थान आणि चेन्नई संघाने खेळाडूंची आदलाबदल (ट्रेड) केली. यात सॅमसन राजस्थानकडून चेन्नईकडे गेला, तर चेन्नईने रवींद्र जडेजा आणि सॅम करन यांना राजस्थानकडे पाठवले. सॅमसनच्या जागी आता राजस्थान संघाच्या नेतृत्वाची धुरा रियान परागकडे सोपविण्यात आली आहे.
‘‘संजूबाबत बोलायचे, तर त्याची जागा घेऊ शकेल असा खेळाडू सापडणे अशक्यच आहे. आम्ही कदाचित त्याच्यासारखेच कौशल्य असलेल्या एखाद्या खेळाडूचा शोध घेऊ शकतो किंवा त्याच्या फलंदाजीच्या क्रमांकावर दुसर्या कोणाला पाठवू शकतो. मात्र, त्याच्यासारखा प्रभाव पाडणारा खेळाडू आम्हाला मिळू शकणार नाही. ज्या प्रकारे विराट कोहली किंवा रोहित शर्मा यांना कोणताही पर्याय नाही, त्याच प्रमाणे संजूलाही कोणताही पर्याय नाही. तो इतका उत्कृष्ट खेळाडू आहे,’’ असे रियान म्हणाला.
सॅमसनने दोन वेगवेगळ्या टप्प्यांवर मिळून ११ वर्षे राजस्थान रॉयल्सचे प्रतिनिधित्व केले. त्याच्या नेतृत्वाखालील राजस्थानने २०२२ मध्ये ‘आयपीएल’ची अंतिम फेरी गाठली होती. सॅमसन ‘आयपीएल’च्या गेल्या हंगामातील काही सामन्यांना मुकला होता. त्याच्या अनुपस्थितीत रियान परागनेच संघाचे नेतृत्व केले होते. मात्र, राजस्थानला १४ पैकी १० सामन्यांत पराभव पत्करावा लागला. त्यामुळे १० संघांच्या या स्पर्धेत राजस्थान नवव्या स्थानावर राहिला. असे असूनही आगामी हंगामासाठी रियानकडेच कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली आहे.
‘‘या वर्षी आमचा अधिक चांगल्या नियोजनावर आणि सामन्यांच्या शेवटच्या टप्प्यातील खेळ सुधारण्यावरही भर असेल. गेल्या वर्षी ५-६ सामने असे होते, जे आम्ही अगदी शेवटच्या षटकात किंवा शेवटच्या चेंडूवर गमावले होते.
आम्ही अशा पराभवांचे विजयात रूपांतर केले असते, किंवा आमची रणनीती अधिक अचूक असती, तर परिस्थिती वेगळी असती. ते सामने जिंकून आम्ही बाद फेरीसाठी पात्र ठरलो असतो. यंदा आम्ही या चुका सुधारण्याचा प्रयत्न करू,’’ असे रियानने स्पष्ट केले.
राजस्थान रॉयल्सचे मोठे नुकसान -ड्यूप्लेसिस
’ गेल्या काही वर्षांत राजस्थान रॉयल्स म्हणजेच संजू सॅमसन असे चित्र निर्माण झाले होते. तो या संघाचा चेहरा आणि प्रमुख खेळाडू होता. त्यामुळे आता त्याला गमावल्याने राजस्थान संघाचे मोठे नुकसान झाले आहे. त्याची उणीव राजस्थानला जाणवेल, असे मत दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फॅफ ड्यूप्लेसिसने व्यक्त केले.
’ ‘‘आयपीएलमधील सर्व आघाडीच्या संघांवर नजर टाकल्यास त्यात एकतरी नामांकित भारतीय खेळाडू दिसतो. रोहित शर्मा (मुंबई इंडियन्स), महेंद्रसिंह धोनी (चेन्नई सुपर किंग्ज) आणि विराट कोहली (रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु) हे दिग्गज खेळाडू त्यांच्या संघाचा चेहरा आहेत. माझ्या मते, सॅमसनही त्यांच्या पंगतीत बसू शकतो. तो राजस्थान रॉयल्सचा चेहरा होता,’’ असे ड्यूप्लेसिस म्हणाला.
’ ‘‘मी जेव्हा राजस्थान संघाबाबत विचार करतो, तेव्हा पहिले नाव सॅमसनचेच आठवते. आता सॅमसन अन्य संघात जाणे हा त्यांच्या चाहत्यांसाठी नक्कीच मोठा धक्का असेल. राजस्थान संघ आणि ‘आयपीएल’साठीही ही मोठी गोष्ट आहे. आता राजस्थानला नव्या चेहर्याचा शोध घ्यावा लागणार आहे. विशेषत: यशस्वी जैस्वालवरील जबाबदारी वाढेल. त्याला केवळ स्वत:च्या खेळाचा विचार करता येणार नाही,’’ असेही ड्यूप्लेसिसने नमूद केले.
प्रत्येक ट्वेन्टी-२० सामन्यात असे ३-४ निर्णय घ्यावे लागतात, जे सामन्याची दिशाच बदलून टाकतात. जर आम्ही ते छोटे निर्णय योग्य रणनीती आणि नियोजनासह घेतले, तर यंदाचा हंगाम आमच्यासाठी नक्कीच वेगळा ठरेल. – रियान पराग, कर्णधार, राजस्थान रॉयल्स
