Royal Challengers Bengaluru vs Lucknow Super Giants: आयपीएल २०२६ स्पर्धेतील २३ वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि लखनौ सुपर जायंट्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. बंगळुरूतील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर २०० पेक्षा अधिक धावांचा डोंगर उभारला जातो. पण रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघातील गोलंदाजांना श्रेय द्यावं लागेल. एकापेक्षा एक स्टार फलंदाजांची फौज असलेल्या लखनौ सुपर जायंट्स संघाचा डाव अवघ्या १४६ धावांवर संपुष्टात आणला. त्यानंतर फलंदाजांनी आपलं काम पूर्ण केलं. विराट कोहली, रजत पाटीदार आणि जितेश शर्मा यांनी केलेल्या दमदार फटकेबाजीच्या बळावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने १४७ धावांचे आव्हान ५ गडी राखून पूर्ण केले आणि दमदार विजय मिळवला.
या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या लखनौच्या फलंदाजांना हवी तशी सुरुवात करून देता आली नाही. सलामीला आलेल्या मिचेल मार्शने ४० धावा केल्या. तर एडन मारक्रम अवघ्या १२ धावा करून माघारी परतला. कर्णधार ऋषभ पंत पुन्हा एकदा फ्लॉप ठरला. तो १ धाव करून माघारी परतला. तर निकोलस पूरन देखील १ धाव करून बाद झाला. शेवटी आयुष बदोनीने ३८ धावांचे बहुमूल्य योगदान दिले. गेल्या सामन्यात अर्धशतकी खेळी करून विजय मिळवून देणाऱ्या मुकुल चौधरीने या सामन्यात ३९ धावांचे योगदान दिले. पण लखनौचा डाव १४६ धावांवर आटोपला.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला हा सामना जिंकण्यासाठी १४७ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला सुरुवातीलाच मोठा धक्का बसला. फिल सॉल्ट अवघ्या ७ धावा करून माघारी परतला. विराट कोहली या सामन्यात इम्पॅक्ट प्लेअर म्हणून फलंदाजीला आला. त्याने ३४ चेंडूत ६ चौकार आणि १ षटकाराचा साहाय्याने ४९ धावांची खेळी केली.
देवदत्त पडिक्कलने १०, रजत पाटीदारने २७, जितेश शर्माने २३ धावांची खेळी केली. तर शेवटी टीम डेव्हिड आणि रोमारिओ शेफर्डने प्रत्येकी १४-१४ धावांची खेळी करून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला २९ चेंडू शिल्लक ठेवून आणि ५ गडी राखून विजय मिळवून दिला.
