आयपीएल २०२६ स्पर्धेतील २३ वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि लखनौ सुपर जायंट्स या दोन्ही संघांमध्ये सुरू आहे. बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघातील गोलंदाजांनी सार्थ ठरवला. लखनौच्या फलंदाजांना हवी तशी सुरुवात करता आलेली नाही. कर्णधार ऋषभ पंतला दुखापतीमुळे मैदान सोडावं लागलं आहे. दरम्यान पंत बाहेर जात असताना जोश हेझलवूडने केलेल्या कृतीचं जोरदार कौतुक होत आहे.

आयपीएलमध्ये आतापर्यंत अनेक महत्वाचे खेळाडू दुखापतग्रस्त झाले आहेत. एमएस धोनी दुखापतीमुळे आतापर्यंत एकही सामना खेळू शकलेला नाही. तर रोहित शर्मा आणि विराट कोहली एकाच सामन्यात दुखापतग्रस्त झाले होते. आता या दुखापतग्रस्त खेळाडूंच्या यादीत आणखी एक नाव जोडलं गेलं आहे. मोठा फटका खेळत असताना ऋषभ पंतच्या हाताला दुखापत झाली आहे.

आयपीएलमध्ये आतापर्यंत एकच फॉर्म्युला पाहायला मिळाला आहे. नाणेफेक जिंकायचं आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घ्यायचा. त्यानंतर पावरप्लेच्या षटकात मोठी धावसंख्या उभारायची. पण लखनौला हवी तशी सुरुवात करता आली नाही.

नेमकं काय घडलं?

३२ धावांवर लखनौला पहिला मोठा धक्का बसला. रसिक सलामने एडन मारक्रमला १२ धावांवर बाद करत माघारी धाडलं. त्यानंतर डावखुऱ्या हाताचा फलंदाज ऋषभ पंत फलंदाजी करण्यासाठी आला. त्यावेळी जोश हेझलवूड गोलंदाजी करत होता. पहिल्या चेंडूवर मिचेल मार्शने १ धाव घेऊन ऋषभ पंतला स्ट्राईक दिली. पुढचे २ चेंडू त्याने ऋषभ पंतने फिरवायचा प्रयत्न केला.

पण चेंडू आणि बॅटचा हवा तसा संपर्क झाला नाही. त्यानंतर तिसरा चेंडू त्याने वेगाने टाकला. जो ऋषभ पंतच्या कोपरला जाऊन लागला. तो वेदनेने कळवळताना दिसला. त्यावेळी गोलंदाजी करत असलेला जोश हेझलवूड त्याची विचारपूस करताना दिसून आला. त्याला धीर दिला. हेझलवूडच्या या कृतीचं जोरदार कौतुक होत आहे. ३ चेंडू खेळून त्याला मैदान सोडून जावं लागलं होतं. त्यानंतर विकेट्स पडल्यामुळे त्याला पुन्हा एकदा फलंदाजी करण्यासाठी मैदानात यावं लागलं. पण पुन्हा एकदा फलंदाजीला येऊनही तो छाप सोडू शकला नाही. तो ६ चेंडूत १ धाव करून माघारी परतला.