Liam Livingstone: आयपीएल २०२६ स्पर्धेत पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या सनरायझर्स हैदराबादने दमदार कामगिरी केली. गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी राहिलेल्या हैदराबादला एलिमिनेटरच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सकडून पराभवाचा सामना करावा लागला. या हंगामातील सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये पॅट कमिन्स नव्हता, त्याच्या जागी इशान किशनने नेतृत्वाची भूमिका योग्यरित्या पार पाडली. तर इतर खेळाडूंना जी जबाबदारी देण्यात आली होती, ती त्यांनी योग्यरित्या पार पाडली. यादरम्यान एक खेळाडू असा होता, ज्याला या हंगामासाठी १३ कोटी मोजून संघात स्थान देण्यात आलं होतं. पण तो मानधनाला मान देऊ शकलेला नाही. कोण आहे.

सनरायझर्स हैदराबादचा संघ आपल्या स्फोटक फलंदाजी लाईनअपसाठी ओळखला जातो. या संघात एकापेक्षा एक स्फोटक फलंदाज आहेत. ज्यात आयपीएल २०२६ स्पर्धेसाठी इंग्लंडचा स्टार फलंदाज लियाम लिव्हिंगस्टोनची भर पडली. आयपीएल २०२६ स्पर्धेसाठी झालेल्या लिलावात काव्या मारनने लियाम लिव्हिंगस्टोनवर १३ कोटींची बोली लावून आपल्या संघात स्थान दिलं. पण तो नावाला आणि मानधनाला साजेशी कामगिरी करु शकलेला नाही. या हंगामात त्याला २ सामने खेळण्याची संधी मिळाली. या दोन्ही सामन्यांमध्ये तो पूर्णपणे फ्लॉप ठरला.

या हंगामातील २ सामन्यांमध्ये त्याला केवळ १५ धावा करता आल्या. त्यानंतर त्याला खेळण्याची संधी दिली गेली नाही. त्याला चेन्नई सुपर किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स संघाविरूद्ध झालेल्या सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. यादरम्यान त्याने एका सामन्यात १४ धावा केल्या. तर दुसऱ्या सामन्यात तो १ धाव करुन बाद झाला. जर त्याच्या एका धावाची किंमत काढली, तर सनरायझर्स हैदराबादला त्याच्या एका धावेसाठी ८६.६६ लाख रुपये मोजावे लागले आहेत. त्याची या हंगामातील फ्लॉप कामगिरी पाहता, आगामी हंगामात त्याला रिलीज केले जाऊ शकते.

लियाम लिव्हिंगस्टोनचा समावेश हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील स्फोटक फलंदाजांच्या यादीत केला जातो. पण त्याची गेल्या काही हंगामातील कामगिरी पाहता, आगामी हंगामात तो अन्सोल्ड होऊ शकतो. तो गेले काही वर्ष पंजाब किंग्स संघाचा भाग होता. त्यानंतर त्याला रिलीज करण्यात आलं होतं. त्यानंतर त्याला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने आपलया संघात स्थान दिलं. या हंगामात तो सनरायझर्स हैदराबादचा भाग होता. आता आगामी हंगामात त्याला खेळण्याची संधी मिळणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.