Sunil Gavaskar On IPL Scouts: आयपीएल २०२६ स्पर्धेतील अंतिम सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि गुजरात टायटन्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने बाजी मारुन जेतेपदाचा मान पटकावला. या हंगामात युवा खेळाडूंचा बोलबाला पाहायला मिळाला. पण काही खेळाडू या हंगामात पूर्णपणे फ्लॉप ठरले. आयपीएलमध्ये निवड होणारे बरेचशे खेळाडू हे स्टेट क्रिकेट असोसिएशनकडून आयोजित करण्यात आलेल्या लीग स्पर्धांमध्ये केलेल्या कामगिरीच्या आधारे निवडलेले असतात. हे खेळाडू त्या स्तरावर दमदार पॉवर हिटींग करतात. यासह गोलंदाजीतही त्यांचा बोलबाला पाहायला मिळतो. पण जेव्हा हेच खेळाडू आयपीएल खेळण्यासाठी येतात, तेव्हा हवी तशी कामगिरी होत नाही. यावर भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. गावसकर यांनी वॉर्निंग दिली आहे की, आयपीएल आणि छोट्या लीग स्पर्धांमध्ये खूप मोठा गॅप आहे.
सुनील गावसकर यांनी स्पोर्ट्सस्टारवर लिहिलेल्या कॉलममध्ये आपलं मत मांडलं आहे. त्यांनी लिहिले की, “वेगवेगळ्या राज्य आणि शहरी लीग स्पर्धेतील पॉवर हिटर्स आयपीएलमध्ये स्पर्धेत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या गोलंदाजांसमोर फलंदाजी करताना फ्लॉप ठरले आहेत.” आयपीएलमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटसह देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केलेल्या खेळाडूंचाही समावेश असतो. यासह फ्रँचायझी सध्या लोकल टी-२० स्पर्धांमध्ये चमकणाऱ्या खेळाडूंनाही संधी देत आहे.
गावसकरांच्या मते, शहरी आणि राज्य क्रिकेट लीग स्पर्धेतील गोलंदाजी आणि फलंदाजीचा दर्जा हा आयपीएल इतका चांगला नाही. आयपीएलसाठी खेळाडूंची निवड करताना केवळ आकडेवारी न पाहता वास्तविक क्षमतेची चाचपणी करणे गरजेचे असल्याचे गावस्कर यांनी आपल्या लेखात म्हटले आहे. फ्रँचायझींनी हे तपासून पाहिले पाहिजे की, त्यांचे टॅलेंट शोधणारे स्काउट्स हे खेळाडूंचे एजंट किंवा स्थानिक लीगमध्ये फुगवून दाखवलेल्या कामगिरीच्या प्रभावाखाली येणार नाहीत.
गावसकरांनी पुढे लिहिले की, “जेव्हा फ्रँचायझीकडून एखाद्या खेळाडूवर कोटींची बोली लावली जाते आणि मग त्याला जास्त सामने खेळण्याची संधी दिली जात नाही, यावरुन हे स्पष्ट होऊन जातं की टॅलेंट स्काऊट्सने त्यांना डमी खेळाडू शोधून दिला आहे.” गावसकरांनी असंही लिहिले की, आयपीएलमध्ये नाव मोठं करुन निवड झालेले खेळाडू फार काळ टिकत नाहीत. इथे कुठल्याही खेळाडूचं मू्ल्य झटक्यात वाढू शकतं आणि तितक्याच लवकर ते कमीही होऊ शकतं.
