Sunil Gavaskar IPL Final Prediction: आयपीएल २०२६ स्पर्धा सध्या शेवटच्या टप्प्यात आहे. लवकरच या स्पर्धेतील प्लेऑफमध्ये प्रवेश करणारे ४ संघ कोण? हे चित्र स्पष्ट होणार आहे. आतापर्यंत एकाही संघाला प्लेऑफमध्ये स्थान मिळवता आलेलं नाही. ५ वेळचा चॅम्पियन मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्सचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. दरम्यान कोणते २ संघ या हंगामातील फायनलमध्ये प्रवेश करणार? याबाबत सुनील गावसकरांनी मोठी भविष्यवाणी केली आहे.
जियोस्टारवर बोलताना सुनील गावसकर म्हणाले की, “मी अजूनही पंजाब किंग्स संघाचं समर्थन करेन. कधीकधी लागोपाठ पराभव झाल्याने सावरण्याची संधी मिळते. त्यामुळे आत्मविश्वास पुन्हा मिळवण्यास मदत होते. तर दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्सने असे सामने गमावले आहेत, जे त्यांनी जिंकायला हवे होते. पंजाब किंग्स संघाला माहीत असेल की, स्पर्धेतील हा टप्पा किती महत्वाचा आहे. अजून एका पराभवामुळे त्यांचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो. मला तरी हेच वाटतं की, या हंगामात पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे दोन्ही संघ अंतिम फेरीत प्रवेश करु शकतात.”
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने या स्पर्धेत आतापर्यंत दमदार कामगिरी केली आहे. मुंबई इंडियन्स संघाविरूद्ध झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने दमदार विजयाची नोंद केली. ११ पैकी ७ सामने जिंकून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ १४ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे.गेल्या हंगामातही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ अंतिम फेरीत पोहोचला होता आणि अंतिम फेरीत पंजाबला हरवून जेतेपदाचा मान मिळवला होता. गावसकरांच्या मते, यावेळीही हे दोन्ही संघ अंतिम सामन्यात आमनेसामने येऊ शकतात. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला जर टॉप २ मध्ये कायम राहायचं असेल, तर ३ पैकी २ सामने जिंकणं गरजेचं आहे.
तर दुसरीकडे पंजाब किंग्स संघाने जोरदार सुरुवात केली होती. पंजाबने सुरुवातीच्या ६ सामन्यांमध्ये लागोपाठ विजय मिळवला होता. यादरम्यान एक सामना पावसामुळे रद्द झाला होता. पण त्यानंतर पंजाबला लागोपाठ ३ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. सध्या १३ गुणांसह पंजाबचा संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानी आहे. पंजाबला सर्वात आधी प्लेऑफमध्ये जाण्यासाठी प्रबळ दावेदार मानलं जात होतं. पण असं काहीच झालेलं नाही. आता पंजाब प्लेऑफमध्ये प्रवेश करणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
