IPL TRP Report: भारतात सध्या आयपीएल २०२६ स्पर्धेचा थरार सुरू आहे. या स्पर्धेतील पहिल्या टप्प्यातील सामने संपले असून आता येत्या काही दिवसात प्लेऑफच्या सामन्यांना सुरुवात होणार आहे. आयपीएल स्पर्धा ही जगातील सर्वात लोकप्रिय स्पर्धांपैकी एक आहे. पण पहिल्या टप्प्यातील सामने संपल्यानंतर समोर आलेल्या आकडेवारीनुसार, या स्पर्धेची लोकप्रियता कमी झाल्याची माहिती समोर येत आहे. या स्पर्धेत एकापेक्षा एक मोठे रेकॉर्ड मोडले गेले आहेत. पण टीआरपीमध्ये मोठी घसरण झाली आहे. यासह ही स्पर्धा प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यात आणि जाहिरातीदारांना खेचून आणण्यात देखील अपयशी ठरली आहे.
आयपीएलच्या टीआरपीमध्ये मोठी घसरण
आयपीएलच्या १८ हंगामात टीआरपीने सर्वच रेकॉर्ड मोडले आहेत. स्पर्धेतील पहिल्या टप्प्यातील सामने समोर आल्यानंतर TAM sports आणि BARC India ची आकडेवारी समोर आली आहे. या आकडेवारीनुसार आयपीएलच्या लोकप्रियतेत मोठी घसरण झाली आहे. टीआरपीमध्ये १८.८ टक्के इतकी घसरण झाली आहे. आतापर्यंत आयपीएलचा टीआरपी ४.५७ इतका होता. पण आता हा घसरून ३.७१ वर जाऊन पोहोचला आहे.
आतापर्यंत आयपीएल स्पर्धेने लोकप्रियतेचे सर्व रेकॉर्ड मोडले होते. आता प्रेक्षकांच्या संख्येत. २६ टक्के इतकी घसरण झाली आहे. आधी या स्पर्धेची व्हिवरशिप १२.४० कोटी इतकी होती. आता ही कमी होऊन ११.३५ कोटी वर जाऊन पोहोचली आहे.
ही धक्कादायक आकडेवारी पाहता हे स्पष्ट झालं आहे की, यंदा प्रेक्षकांनी आयपीएलला पाठ फिरवली आहे. केवळ प्रेक्षक नव्हे, तर जाहिरातदारांनी देखील पाठ फिरवल्याचं चित्र आहे. आयपीएल २०२६ स्पर्धेच्या जाहिरातदारांच्या संख्येत ३१ टक्क्यांनी घसरण झाली आहे. आधी ही संख्या ६५ हून अधिक होती. पण आता घसरून ४५ इतकी राहिली आहे. आयपीएल २०२६ स्पर्धेसाठी २४ नवे ब्रँड जोडले गेले आहेत. पण ४४ ब्रँड्स हे आधीपासून होते.
| तपशील | आधीची आकडेवारी | आताची आकडेवारी (२०२६) | घसरण (%) |
| टीआरपी (TRP) | ४.५७ | ३.७१ | १८.८% |
| व्हिवरशिप (कोटी) | १२.४० | ११.३५ | २६% |
| जाहिरातदार संख्या | ६५+ | ४५ | ३१% |
स्पर्धेची लोकप्रियता कमी होण्याचं कारण काय?
आयपीएल स्पर्धा ही जगातील सर्वात लोकप्रिय स्पर्धेपैकी एक आहे. पण या स्पर्धेची लोकप्रियता अचानक कमी का झाली? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. यामागे अनेक कारणं आहेत. सोशल मीडियावरील चर्चांनुसार, स्पर्धेतील सामन्यांची संख्या, खेळपट्ट्या आणि फॅन्टन्सी ॲप बंद होणं ही काही प्रमुख कारणं आहेत. दरदिवशी सामने असल्याने प्रेक्षकांनी सामने पाहणं कमी केलं आहे. खेळपट्ट्या अशा तयार करण्यात आल्या आहेत, ज्यावर फलंदाजांची चांदी होत आहे, तर गोलंदाजांसाठी काहीच मदत नाही. त्यामुळे एकतर्फी सामने पाहायला मिळत आहेत.
