Team India Probable Sqaud For Asian Games: आयपीएल २०२६ स्पर्धेत एकच नाव तुफान चर्चेत आहे, ते म्हणजे वैभव सूर्यवंशी. १५ वर्षांच्या मुलाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवणाऱ्या खेळाडूंची चांगलीच धुलाई केली आहे. त्याची फलंदाजी पाहता, लवकरच तो भारतीय संघात पदार्पण करू शकतो. एका वृत्तात असा दावा करण्यात आला आहे की, बीसीसीआयने वैभव सूर्यवंशीला भारतीय संघात स्थान देण्याची प्लॅनिंग सुरू केली आहे. आगामी एशियन गेम्स स्पर्धेसाठी बीसीसीआयने संभावित खेळाडूंची यादी तयार केली आहे, ज्यात वैभव सूर्यवंशीच्या नावाचा समावेश आहे.
अमर उजालाने दिलेल्या वृत्तानुसार, आगामी एशियन गेम्स स्पर्धेसाठी बीसीसीआयने ३० खेळाडूंची यादी तयार केली आहे. या ३० खेळाडूंमधून १५ खेळाडूंचा संघ निवडला जाणार आहे. मुख्य बाब म्हणजे सूर्यकुमार यादव आणि मोहम्मद सिराजसारख्या अनुभवी खेळाडूंना या संघात स्थान देण्यात आलेलं नाही. त्यामुळे सूर्यकुमार यादवचा कर्णधारपदावरून पत्ता कट होऊ शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या संघात ऋषभ पंत, यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीसारख्या खेळाडूंना संघात स्थान देण्यात आलं आहे.
सूर्यकुमार यादवचा पत्ता कट होणार?
सूर्यकुमार यादव हा भारतीय टी-२० संघाचा कर्णधार आहे. सूर्याच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाने २०२६ टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत जेतेपदाचा मान पटकावला होता. या स्पर्धेदरम्यानही सूर्यकुमार यादव फलंदाजीत पूर्णपणे फ्लॉप ठरला होता. त्यानंतर आयपीएल २०२६ स्पर्धेतही तो फलंदाजीत पूर्णपणे फ्लॉप ठरला. त्यामुळे त्याचं कर्णधारपद जाण्याची आणि संघाबाहेर होण्याची भीती वर्तवली जात आहे. सद्यस्थिती पाहता, भारतीय संघाला नवा टी-२० कर्णधार मिळू शकतो. ही जबाबदारी कोणाला मिळणार हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही.
एशियन गेम्स स्पर्धेसाठी असा आहे भारतीय खेळाडूंचा संभावित संघ:
वैभव सूर्यवंशी, अक्षर पटेल, ऋषभ पंत, श्रेयस अय्यर,हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह, इशान किशन, संजू सॅमसन, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, खलील अहमद, ऋतुराज गायकवाड, अर्शदीप सिंग, यशस्वी जैस्वाल, शिवम दुबे, तिलक वर्मा, प्रसिध कृष्णा, रवी बिश्नोई, रिंकू सिंग, अभिषेक शर्मा, वरुण चक्रवर्ती, शाहबाज अहमद, अनुकूल रॉय, ध्रुव जुरेल, हर्षित राणा, नितीश रेड्डी, यश ठाकुर, आयुष बदोनी, हर्ष दुबे, विपराज निगम.
