Babar Azam Reaction On Vaibhav Sooryavanshi Century: सध्या भारतात आयपीएल २०२६ स्पर्धेचा थरार सुरू आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानात पाकिस्तान सुपर लीग स्पर्धा सुरू आहे. आयपीएलमध्ये १५ वर्षीय फलंदाज वैभव सूर्यवंशीच्या फलंदाजीचा बोलबाला पाहायला मिळत आहे. वैभवने सनरायझर्स हैदराबाद संघाविरुद्ध झाकलेल्या सामन्यात अवघ्या १५ चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. तर ३६ चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं. या खेळीदरम्यान त्याने अनेक मोठे रेकॉर्ड मोडून काढले आहेत. एकीकडे १५ वर्षांच्या फलंदाजाने वेगवान शतक झळकावलं. तर दुसरीकडे बाबर आझमने पीएसएलमध्ये ४० चेंडूत ५० धावांची खेळी केली. दरम्यान पत्रकार परिषदेत पत्रकाराने बाबर आझमला वैभव सूर्यवंशीच्या खेळीवरून प्रश्न विचारला. त्यावर बाबर आझमने दिलेल्या प्रतिक्रियेची जोरदार चर्चा रंगली आहे.

आयपीएलमध्ये वैभव सूर्यवंशीने ३६ चेंडूत शतक झळकावलं त्यावेळी बाबर आझमने अवघ्या ४० चेंडूत ५० धावांची खेळी केली. यावर बाबर आझमला त्याची प्रतिक्रिया काय आहे , असा प्रश्न विचारण्यात आला होता.

बाबर आझमने या प्रश्नाचं उत्तर देण्यास नकार दिला. बाबर म्हणाला, “मला माहीत आहे तुम्ही मला हा प्रश्न का विचारताय ते..” पाकिस्तानी पत्रकाराने विचारले, “आयपीएल २०२६ स्पर्धेत १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीने ३६ चेंडूत शतक पूर्ण केलं आहे. त्याच दिवशी तू ४० चेंडूत ५० धावा केल्या आहेत. तुला असं वाटत नाही का, पाकिस्तानने आपल्या फलंदाजी शैलीत बदल करायला हवा? यावर प्रतिक्रिया देताना बाबर आझम म्हणाला, “मला या प्रश्नाचं उत्तर नाही द्यायचं.”

वैभव सूर्यवंशीने आयपीएल २०२६ स्पर्धेत इतिहासाला गवसणी घातली आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्याग वैभवने अवघ्या ३६ चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं. याआधी त्याने ३५ चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं होतं. आता हे आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील तिसरे सर्वात वेगवान शतक ठरले आहे. या शतकी खेळीदरम्यान त्याने १२ षटकार आणि ५ चौकार खेचले. एकीकडे युवा फलंदाज आपल्या कामगिरीमुळे लक्ष वेधून घेत आहे. तर दुसरीकडे अनुभवी फलंदाज बाबर आझम आपल्या स्ट्राईक रेटमुळे चर्चेत आहे.