Vaibhav Sooryavashi Record: आयपीएल २०२६ स्पर्धेत एकच नाव तुफान चर्चेत राहिलं, ते म्हणजे वैभव सूर्यवंशी. या १५ वर्षीय फलंदाजासाठी हे हंगाम खूप खास ठरलं. अनेक दिग्गज फलंदाजांना जे करण्यासाठी अनेक वर्ष लागली, त्याहून अधिक वैभवने एकाच हंगामात मिळवलं आहे. ख्रिस गेलने २०११ मध्ये झालेल्या हंगामात धावांचा पाऊस पाडला, त्यानंतर २०१६ मध्ये विराटचं वादळ पाहायला मिळालं. त्यानंतर ऋतुराज गायकवाडने २०२१ मध्ये झालेल्या हंगामात ऑरेंज कॅपवर कब्जा केला, उदयोन्मुख खेळाडूचा पुरस्कार पटकावला. पण वैभवने एकाच हंगामात एकाहून अनेक पुरस्कार जिंकून अनेक रेकॉर्ड मोडून काढले आहेत.

वैभवने आयपीएल २०२६ स्पर्धेत ज्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली, ते आजवर कुठल्याही फलंदाजाला करता आलेलं नाही. एका हंगामात सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड असणाऱ्या विराटने ९७३ धावा १५२.०३च्या स्ट्राईक रेटने केल्या होत्या. त्यानंतर डेव्हिड वॉर्नरने जेव्हा ८४८ धावा केल्या, त्या १५१.४२ च्या स्ट्राईक रेटने केल्या होत्या. तर जोस बटलरने २०२२ मध्ये १४९.०५ च्या स्ट्राईक रेटने ८६३ धावा केल्या होत्या. गिलने ८९० धावा या १५७.८० च्या स्ट्राईक रेटने केल्या होत्या. वैभवने या सर्व फलंदाजांहून कमी धावा करुन ऑरेंज कॅप पटकावली. पण त्याने जे केलं, ते आजवर कोणालाच जमलं नाही. त्याने ७७६ धावा या २३८ च्या स्ट्राईक रेटने केल्या आहेत.

साई सुदर्शनचा रेकॉर्ड मोडला

वैभवने वयाच्या १५ व्या वर्षी ऑरेंज कॅपवर नाव कोरलं आहे. यासह तो आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात ऑरेंज कॅप जिंकणारा सर्वात युवा खेळाडू ठरला आहे. हा रेकॉर्ड तुटण्याची शक्यता खूप कमी आहे. गेल्या हंगामात साई सुदर्शनने ऑरेंज कॅपवर कब्जा केला होत. शुबमन गिलचा रेकॉर्ड मोडत, तो ऑरेंज कॅप जिंकणारा सर्वात युवा फलंदाज ठरला होता. आता वैभवने हा रेकॉर्ड मोडला आहे. वैभवने वयाच्या १५ व्या वर्षी हा पराक्रम केला आहे. वैभव हा राजस्थान रॉयल्ससाठ ऑरेंज कॅप जिंकणारा दुसरा खेळाडू ठरला आहे. याआधी २०२२ मध्ये जोस बटलरन ८६३ धावा करुन ऑरेंज कॅपवर कब्जा केला होता.

आयपीएल २०२६ स्पर्धेत वैभव सूर्यवंशीची दमदार कामगिरी

वैभव सूर्यवंशीने या हंगामात अनेक मोठे रेकॉर्ड मोडून काढले आहेत. वैभवने १००० धावा पूर्ण केल्या आहेत. यासह तो आयपीएल स्पर्धेत सर्वात जलद १००० धावा करणारा फलंदाज ठरला. वैभवने या स्पर्धेतील ४४० चेंडूंमध्ये १००० धावा करण्याचा पल्ला गाठला आहे. सर्वात जलद धावा करण्याचा रेकॉर्ड करण्यासह वैभवने आणखी एक मोठा रेकॉर्ड मोडून काढला आहे. वैभव हा एकाच हंगामात सर्वाधिक षटकार खेचणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी पोहोचला आहे. वैभवने या हंगामात फलंदाजी करताना ७२ षटकार खेचले आहेत. आधी हा रेकॉर्ड ख्रिस गेलच्या नावावर होता. गेलने ५९ षटकार खेचले होते. पण आता हा रेकॉर्ड वैभवच्या नावावर आहे.