आयपीएलचा १९वा हंगाम निम्मा झाला आहे. प्लेऑफ्स अर्थात बाद फेरीत स्थान पटकावण्यासाठी संघांमध्ये चुरस सुरू झाली आहे. धावांचा महापूर लोटल्यागत स्थिती आहे. नवे खेळाडू समोर येत आहेत. मात्र हे सगळं असलं तरी आयपीएलचे टीव्ही रेटिंग्जमध्ये आणि जाहिरातदारांमध्ये महत्त्वपूर्ण घट झाली आहे. एकीकडे रोज नवे विक्रम रचले जात असताना पाहणाऱ्यांच्या संख्येत घट झाली आहे. का होतंय असं? जाणून घेऊया

आकडेवारी काय सांगते?

BARC इंडिया आणि TAM स्पोर्ट्स यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, टीव्ही रेटिंग्ज आणि जाहिरातांमध्ये ब्रँडचा सहभाग या दोन्ही गोष्टी यंदाच्या हंगामात उतरणीला लागल्या आहेत. डिजिटल माध्यमातून सामने पाहण्याचा कल वाढल्यामुळे टीव्हीवर आयपीएल पाहणाऱ्यांचं प्रमाण कमी झालं आहे. टीव्ही रेटिंग्जमध्ये १८.८ इतकी मोठी घट झाली आहे. २०२५ हंगामात ४.५७ असलेलं प्रमाण यंदा ३.७१ वर आलं आहे. एकूण व्ह्यूअरशिपमध्येही घट पाहायला मिळते आहे. १०.६ मिलिअन वरून ७.८४ मिलिअन एवढं प्रमाण खाली आलं आहे. स्पर्धेच्या टोटल रिचचं प्रमाणही कमी झालं आहे. १२३.९६ मिलिअन वरून ११३.६१ मिलिअन एवढा रिच कमी झाला आहे. ८.३ टक्के एवढी घट झाली आहे. रिचच्या तुलनेत अॅव्हरेज मिनिट ऑडियन्स हे प्रमाण कमी होण्याचा अर्थ चाहते टीव्हीवर आयपीएल सामने पाहतात पण कालावधी कमी झाला आहे.

जाहिरात पातळीवरचे आकडेही चिंताजनक आहेत. आयपीएलचा हंगाम म्हणजे जाहिरातदारांसाठी पर्वणी असतो. पण यंदाचा हंगाम त्याला अपवाद आहे. २०२५ हंगामात आयपीएलशी निगडीत ब्रँड्सची संख्या ६५ होती. यंदा हे प्रमाण ४५वर आलं आहे. ४४ ब्रँड्सनी आयपीएलला रामराम केला. या तुलनेत केवळ २४ नवे ब्रँड्सनी आयपीएलशी जोडलं जाण्यात स्वारस्य दाखवलं. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे २०२५ मध्ये फँटसी गेम्सवर बंदी घालण्यात आली. फँटसी गेम्स, ते खेळणारे चाहते हे सगळंच प्रमाण खाली आलं आहे. याचा मोठा फटका जाहिरातविश्वाला बसला आहे. फँटसी गेम्सच्या अनुपस्थितीत माऊथ फ्रेशनर कंपनी प्रमुख जाहिरातदार झाली आहे.

टीव्हीचे आकडे घटत असले तरी जिओहॉटस्टारसाठी हंगाम उत्तम चालला आहे. ओपनिंग वीकेंडमध्ये डिजिटल रिच ५१५ मिलिअन होता. टोटल वॉच टाईम ३२.६ बिलिअन मिनिट्स एवढा झाला आहे. बीसीसीआय आणि प्रक्षेपणकर्त्या कंपनीसाठी दुधारी तलवार आहे. आयपीएलचं एकूण मूल्यांकन ७६००० कोटी एवढं आहे. टीव्ही आकडेवारीत घट झाल्यामुळे पुढच्या वर्षी वितरित होणाऱ्या मीडिया राईट्ससाठीचे आकडे कमी होऊ शकतात. टीव्हीऐवजी डिजिटलला प्राधान्य मिळू शकतं.

अति टी२० क्रिकेट

गेल्या वर्षीचा आशिया चषक टी२० प्रकारातच झाला होता. भारतीय संघाने त्या स्पर्धेत जेतेपदावर कब्जा केला होता. त्यानंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशात टेस्ट सीरिज खेळला. त्यात भारतीय संघाला पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यानंतर वनडे मालिका झाली. भारतीय संघ ऑस्ट्रेलियात टी२० मालिकेत खेळला. त्यानंतर न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका झाली.त्यानंतर न्यूझीलंडविरुद्ध पाच सामन्यांची टी२० मालिका झाली. आयपीएल सुरू होण्याच्या काही दिवस आधीच टी२० वर्ल्डकप झाला होता. महिनाभर भारत आणि श्रीलंकेत वर्ल्डकपचे सामने झाले होते. अहमदाबाद इथे झालेल्या फायनलमध्ये भारतीय संघाने न्यूझीलंडला नमवत जेतेपदावर नाव कोरलं होतं. ८ मार्चला भारतीय संघाने जेतेपदाची कमाई केली. त्यानंतर आठवडाभर विविध राज्यांमध्ये खेळाडूंचे सत्कार सोहळे, मुलाखती आयोजित होत होतं. महिनाभर भारतीय संघ नियमितपणे टी२० क्रिकेटच खेळत होता. त्याचं गारुड ओसरण्याआधीच आयपीएल सुरू झालं. आयपीएल स्पर्धा एखाद्या रथासारखी चालते. तब्बल दोन महिने सामने सुरू असतात. वीकेंडला तर डबल हेडर म्हणजे दिवसाला दोन सामने असतात. कालच्या सामन्याचा माहोल मनात असतानाच पुढचा सामना सुरू झालेला असतो. गेल्या आठवड्यातला सामना आठवणार नाही अशी परिस्थिती होते. गेले अनेक महिने भारतीय संघ सातत्याने खेळतच आहे. त्यामुळे सामना पाहण्यात नाविन्य किंवा नवेपणा निघून गेला आहे. एक्सक्लुसिव्ह असं काहीच राहिलं नाहीये. टी२० वर्ल्डकपच्या ५५ सामन्यांनंतर अवघ्या दोन आठवड्यात आयपीएल सुरू झालं. मार्च ते मे या कालावधीत आयपीएलचे ७४ सामने होणार आहेत. एकप्रकारे अति झालं आणि अजीर्ण झालं अशी स्थिती आहे.खेळाडूंच्या देहबोलीत थकवा जाणवतो, दिसतो आहे. देशभरात बहुतांश ठिकाणी उष्णतेची लाट आहे. ४० डिग्री तापमानात होणाऱ्या सामन्यात खेळताना प्रचंड ऊर्जा खर्ची पडते. त्यामुळे दुखापतींची संख्याही वाढते आहे. खेळाडू ताजेतवाने व्हावेत यासाठी संघ त्यांना विदेशात सुट्टीवरही पाठवत आहेत.

चौकार-षटकारांचा पाऊस आणि धावांचा महापूर

यंदाचा आयपीएल हंगाम हा एकसुरी आणि एकांगी होत चालला आहे. पॉवरप्लेच्या ६ षटकांमध्ये संघांची शंभरी फलकावर नोंदवली जाते आहे. अतिशय सहजपणे संघ २०० धावांचा टप्पा ओलांडत आहेत. त्याच सहजतेने संघ दोनशे पल्याड धावसंख्येचा यशस्वी पाठलागही करत आहेत. या हंगामानंतर गोलंदाजांऐवजी बॉलिंग मशीन ठेवा असं दर्दी चाहते म्हणत आहेत. खेळपट्ट्या पाटा स्वरुपाच्या आहेत. बॅटचा आकार प्रचंड होत आहे. बाऊंड्री आत आणली जाते. नोबॉल आणि वाईडचे नियमही फलंदाजांना धार्जिणे आहेत. गोलंदाजांवर उसळते चेंडू टाकण्यावरही मर्यादा आहे. बॅट आणि बॉलमधलं द्वंद्व असं क्रिकेटचं स्वरुप असणं अपेक्षित आहे मात्र यंदाच्या आयपीएल हंगामात गोलंदाजांची सरेआम कत्तल होत आहे. ४ षटकात ६०-७० धावा सहजपणे लुटल्या जात आहेत. धावांचा महापूर असाच सुरू राहिला तर गोलंदाज व्हायची इच्छाच राहणार नाही अशी परिस्थिती आहे. गेल्या तीन हंगामांपासून षटकारांची संख्या हजारपल्याड जाते आहे. यंदाच्या हंगामात चौकार-षटकारांचा नवा विक्रम होण्याची चिन्हं आहेत. १२० चेंडूत २६३ धावा होऊन त्यांचा पाठलागही झाला. गोलंदाजांनी मैदानावर अपमानित होण्यासाठी यायचं आणि परतायचं असं समीकरण झालं आहे. धावांचे, शतकांचे अचंबित करणारे विक्रम होत आहेत पण त्याचाही चाहत्यांना कंटाळा येऊ लागला आहे. शतक झळकावणं ही खास गोष्ट असते मात्र ज्या वेगाने शतकं होत आहेत त्यामुळे शतकाचं मोलही कमी झालं आहे.

जगभरात टी२० लीग

भारतीय खेळाडूंना जगभरात होणाऱ्या टी२० लीगमध्ये खेळण्याची परवानगी नाही. पण बाकी खेळाडू सातत्याने टी२० लीगमध्ये खेळत असतात. पाकिस्तान सुपर लीग, लंका प्रीमिअर लीग, बांगलादेश सुपर लीग, मेजर क्रिकेट लीग, IL टी२०, SAटी२०, बिग बॅश, कॅरेबियन प्रीमिअर लीग अशा ढिगावरी लीग सुरू असतात. आयपीएलमध्ये खेळणारे विदेशी खेळाडू या लीगमध्ये खेळतात. या सगळ्या लीगचे सामने टीव्हीवर तसंच ओटीटीवर पाहायला मिळतात. विदेशी खेळाडूंना फटकेबाजी करताना पाहणं यातही काही नाविन्य राहिलेलं नाही. अनेक लीगमध्ये आयपीएल संघमालकांचेच संघ आहेत. जर्सीचे रंगही सारखेच आहेत. त्यामुळे आयपीएलचाच सामना सुरू आहे असं वाटतं. दर महिन्याला एक लीग होते. याव्यतिरिक्त द हंड्रेड नावाचीही स्पर्धा सुरू आहे. याव्यतिरिक्त डोमेस्टिक क्रिकेटमध्येही खेळाडू खेळतात. ३६५ पैकी फारच कमी दिवस असे असतात ज्यादिवशी कुठला सामना नसतो.

आयपीएलनंतरही अविरत खेळणं सुरूच

आयपीएल संपल्यानंतरदेखील खेळाडूंना आणि पर्यायाने प्रेक्षकांना विश्रांती नाहीये. आयपीएल संपल्यानंतर लगेचच अफगाणिस्तानचा संघ भारतात येणार आहे. जून महिन्यात वूमन्स टी२० वर्ल्डकप होणार आहे. याच काळात भारतीय पुरुष संघ आयर्लंड आणि इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे.त्यानंतर झिम्बाब्वेचा छोटेखानी दौरा आहे. विश्रांतीनंतर वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेचे संघ भारत दौऱ्यावर येणार आहेत. त्यामुळे आताचं अजीर्ण नंतरही सुरूच राहणार आहे.