Virat Kohli Vrindavan Visit: आयपीएल २०२६ स्पर्धेतील अंतिम सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि गुजरात टायटन्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने १५६ धावांचा यशस्वी पाठलाग केला आणि लागोपाठ दुसऱ्यांदा आयपीएलच्या जेतेपदाची ट्रॉफी उंचावली. अंतिम सामन्यात विराट कोहली विजयाचा हिरो ठरला. दरम्यान विजय मिळवल्यानंतर ४८ तासाच्या आत विराटने वृंदावनात हजेरी लावली. कोहलीसह त्याची पत्नी अनुष्का शर्मा देखील दिसून आली. दोघांचा वृंदावनातील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

विराट कोहलीने गेल्या काही वर्षात अनेकदा प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेण्यासाठी हजेरी लावली आहे. कुठलीही मोठी स्पर्धा असेल किंवा मालिका सुरु होण्याआधी तो प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेण्यासाठी वृंदावनात हजेरी लावत असतो. आता आरसीबीने आयपीएलची ट्रॉफी जिंकल्यानंतर अनुष्का आणि विराट या दोघांनी पहाटे ४ वाजता यमुना नदीच्या काठावर प्रेमानंद महाराजांची भेट घेतली आणि त्यांचे आशीर्वाद घेतले.

यमुना नदीच्या काठावर असलेल्या एका झोपडीत विराट आणि अनुष्काने प्रेमानंद महाराजांची भेट घेतली. दोघांनी महाराजांसोबत जवळपास ४५ मिनिटे अध्यात्मिक चर्चा केली. सोशल मीडियावर काही व्हिडीओ व्हायरल होत आहेत, ज्यात विराट आणि अनुष्का हे दोघे अनवाणी पायी चालताना दिसून येत आहेत. यासह त्यांच्या गळ्यात तुळशीची माळ आणि कपाळावर टिळा लावल्याचं दिसून येत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

प्रेमानंद महाराज यांची भेट घेतल्यानंतर विराट आणि अनुष्काने प्रेमानंद यांचे गुरुवर्य यांची देखील भेट घेतली. दोघांनी श्री हित गौंरगी शरण महाराज यांची भेट घेतली आणि त्यांचेही आशीर्वाद घेतले. विराट आणि अनुष्काने ३० मिनिटं हित गौंरगी शरण महाराज यांच्याशी अध्यात्मिक चर्चा केली. यादरम्यान विराट ‘राधे-राघे’चा जप करताना दिसून आला. विराटला पाहण्यासाठी चाहत्यांनीही तुफान गर्दी केली होती. विराटने याआधीही अनुष्कासोबत प्रेमांनद महाराजांचे आशीर्वाद घेण्यासाठी हजेरी लावली होती. आता आयपीएलनंतर अफगाणिस्तानविरूद्धची वनडे मालिका सुरु होणार आहे. या मालिकेत विराट भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करताना दिसून येईल.