वृत्तसंस्था, नवी दिल्ली
इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) लिलावासाठी अंतिम यादीत एकूण ३५० खेळाडूंचा समावेश करण्यात आला असून ऑस्ट्रेलियाचा ‘फलंदाज’ कॅमरुन ग्रीन, भारताचा अष्टपैलू वेंकटेश अय्यर आणि लेग-स्पिनर रवी बिश्नोई यांना सर्वोच्च श्रेणीत स्थान मिळाले आहे. या तिघांसह एकूण ४० खेळाडूंची मूळ किंमत दोन कोटी रुपये असणार आहे.
‘आयपीएल’च्या पुढील हंगामासाठी खेळाडू लिलाव १६ डिसेंबर रोजी अबू धाबी येथे रंगणार आहे. या लिलावात कॅमरुन ग्रीन सर्वांत महागडा खेळाडू ठरण्याचे भाकीत अनेक जाणकारांनी केले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ग्रीन अष्टपैलू म्हणून प्रचलित आहे. मात्र, ‘आयपीएल’ लिलावासाठी त्याने आपली नोंदणी केवळ फलंदाज म्हणून केली आहे. त्यामुळे सर्व प्रथम बोली लागणाऱ्या खेळाडूंत अर्थात ‘सेट १’मध्ये त्याचा समावेश असेल. यामुळे त्याला मोठी किंमत मिळविणे अधिक सोपे जाईल. या सेटमध्ये ग्रीनसह डेव्हॉन कॉन्वे (न्यूझीलंड), जेक फ्रेझर-मॅगर्क (ऑस्ट्रेलिया), डेव्हिड मिलर (दक्षिण आफ्रिका), पृथ्वी शॉ आणि सर्फराज खान (दोघे भारत) हे फलंदाज असतील.
दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी यष्टिरक्षक-फलंदाज क्विंटन डिकॉकचा प्राथमिक यादीत समावेश नव्हता. मात्र, विविध फ्रँचायझींच्या विनंतीनंतर डिकॉकचे मन वळविण्यात यश आले असून त्याला लिलावासाठी अंतिम यादीत स्थान मिळाले आहे. त्याच्यासाठी १ कोटी रुपये अशी मूळ किंमत असेल. श्रीलंकेचा दुनिथ वेल्लालागे आणि दक्षिण आफ्रिकेचा जॉर्ज लिंडे या फिरकीपटूंचाही अखेरच्या क्षणी यादीत समावेश करण्यात आला आहे.
एकूण ३५० खेळाडूंच्या यादीत २४० भारतीय खेळाडू आहेत. सर्व १० फ्रँचायझींमध्ये मिळून ७७ खेळाडूंची स्थाने रिक्त आहेत. कोलकाता नाइट रायडर्सकडे सर्वाधिक ६४.३० कोटी रुपये उपलब्ध असून त्यांना १३ खेळाडू घेता येतील. चेन्नई सुपर किंग्ज संघ ४३.४० कोटी रुपयांसह लिलावात येईल.
दोन कोटी मूळ किंमत असलेले खेळाडू
भारत : वेंकटेश अय्यर, रवी बिश्नोई
न्यूझीलंड : डेव्हॉन कॉन्वे, रचिन रवींद्र, मायकल ब्रेसवेल, डॅरेल मिचेल, फिन ॲलन, जेकब डफी, मॅट हेन्री, काएल जेमिसन, ॲडम मिल्ने, विल्यम ओरुरर्क
ऑस्ट्रेलिया : जेक फ्रेझर-मॅगर्क, कॅमरुन ग्रीन, स्टीव्ह स्मिथ, शॉन ॲबट, कूपर कॉनली, जोश इंग्लिस
दक्षिण आफ्रिका : डेव्हिड मिलर, जेराल्ड कोएट्झी, आनरिख नॉर्किए, लुंगी एन्गिडी
इंग्लंड : गस ॲटकिन्सन, लियाम लिव्हिंगस्टोन, टॉम करन, डॅनियल लॉरेन्स, लियाम डॉसन, बेन डकेट, जेमी स्मिथ, टॉम बॅन्टन
श्रीलंका : वानिंदू हसरंगा, मथीशा पथिराना, महीश थीकसाना
वेस्ट इंडिज : जेसन होल्डर, शाय होप, अकिल हुसेन, अल्झारी जोसेफ
अफगाणिस्तान : मुजीब उर रहमान, नवीन उल हक
बांगलादेश : मुस्तफिझूर रहमान
