IPL Mini Auction 2026 Analysis मुंबई : इंडियन प्रिमियर लीगच्या लघुलिलावात अर्थात मिनी-ऑक्शनमध्ये १६ डिसेंबर रोजी ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू कॅमेरून ग्रीन या स्पर्धेच्या इतिहासातला सर्वाधिक महागडा परदेशी क्रिकेटपटू ठरला. पण त्याचे वलय त्या दिवशी अल्पजीवी ठरले. कारण त्या दिवशी भाव खाऊन गेले प्रशांत वीर आणि कार्तिक शर्मा हे भारतीय क्रिकेटपटू. दोघांसाठी चेन्नई सुपरकिंग्जनी मोजलेले प्रत्येकी १४ कोटी रुपये त्यांना आजवरचे सर्वांत महागडे नवखे किंवा ‘अनकॅप्ड’ खेळाडू ठरवून गेले. दोघेही फार टी-ट्वेण्टी क्रिकेटही खेळलेले नाहीत. मग त्यांच्यात फ्रँचायझींना असे काय दिसले? की केवळ लिलावयुद्धात परस्परांवर कुरघोडी करण्यासाठी त्यांचा ‘भाव’ वधारत गेला?  

प्रशांत वीर आणि कार्तिक शर्मा

प्रशांत वीर आजवर ९ टी-ट्वेण्टी सामने खेळला असून, त्याची सर्वाधक धावसंख्या ४० आहे. चेन्नईकडून यंदा रवींद्र जडेजा नसेल. त्यामुळे डावखुऱ्या गोलंदाज-फलंदाजाची उणीव भरून काढण्यासाठी प्रशांत वीरच्या नावाला पसंती मिळाली असावी. तो प्रथम उत्तर प्रदेश टी-ट्वेण्टी लीगमध्ये खेळताना सर्वांच्या नजरेस पडला. तेथे त्याने १० सामन्यांत ६४च्या सरासरीने ३२० धावा चोपल्या. चेन्नई सुपरकिंग्जतर्फे त्याला नेट ट्रायलसाठी बोलावण्यात आले होते. त्यामुळे त्यासाठी चेन्नई व्यवस्थापन बोलींवर बोली चढवत का गेले याची कल्पना येते. त्याचे मूळ मूल्य (बेस प्राइस) ३० लाख रुपये इतके होते.

मुंबई इंडियन्स, लखनऊ सुपरजायंट्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज या संघांमध्ये त्याला करारबद्ध करण्यासाठी चुरस लागली. मग राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबादही यात सहभागी झाले. दोनपेक्षा अधिक संघांचा सहभाग बोलींमध्ये असेल, तर सहसा भाव वधारत जातो आणि अनेकदा त्यात संबंधित खेळाडूच्या गुणवत्तेपेक्षा फ्रँचायझींचा मानभावीपणा शिरजोर ठरतो. कार्तिक शर्मा आजवर ९ टी-ट्वेण्टी  सामने खेळलाय. पण त्याने सध्या सुरू असलेल्या सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत चांगली कामगिरी करून दाखवली, ती आयपीएलच्या दृष्टीने लक्षवेधी ठरली. तो राजस्थानकडून खेळत होता. यष्टिरक्षक-फलंदाज ही त्याची ओळख. मुश्ताक अली स्पर्धेत ५ सामन्यांमध्ये १३३ धावा जमवल्या, पण त्याचा १६०.२४ चा स्ट्राइक रेट विध्वंसक ठरतो. त्याची ओळख ‘फिनिशर’ म्हणूनही आहे. 

चेन्नईचे गणित काय?

या मिनी-ऑक्शनमध्ये चेन्नई सुपरकिंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्याकडे सर्वाधिक निधी शिल्लक होता. त्यामुळे ते सर्वाधिक खरेदी करणार हे उघडच होते. तरीदेखील चेन्नईचा दुहेरी जुगार धक्कादायक ठरले. चेन्नईकडे ४३.४० कोटी रुपये होते. त्यातील २८.४० कोटी रुपये त्यांनी प्रशांत आणि कार्तिक यांच्यावर खर्च केले आहेत. आयपीएलच्या इतिहासात हे अभूतपूर्व ठरते. जडेजा गेल्यामुळे त्या तोडीचा किंवा किमान त्याच्या आसपास कामगिरी करू शकेल असा डावखुरा अष्टपैलू म्हणून प्रशांतच्या नावाला पसंती मिळाली.

कार्तिक हा सिक्सर-मॅन म्हणून ओळखला जातो. अखेरच्या निर्णायक षटकांमध्ये षटकारांची बरसात करून सामना फिरवण्याची त्याची क्षमता असल्याचे चेन्नईच्या धुरीणांना वाटते. पण यामागे कदाचित त्यांची गत हंगामातली निराशाजनक कामगिरी कारणीभूत ठरते. त्या हंगामापूर्वी चेन्नई आयपीएलमध्ये केवळ तीन वेळाच प्ले-ऑफपर्यंत जाऊ शकली नव्हती. मात्र २०२५ हंगामात चेन्नईची धूळधाण उडाली. कर्णधार ऋतुराज गायकवाड हंगामाच्या सुरुवातीस जायबंदी झाला आणि महेंद्रसिंग धोनीचा ऐनवेळी झालेला समावेश त्या संघाला सुमार कामगिरीपासून वाचवू शकला नाही.

घरच्या चेपॉक मैदानावर चेन्नईचा सलग पाच सामन्यांमध्ये पराभव झाला, जो एक विक्रमच. प्ले-ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडणाराही तो पहिलाच संघ ठरला. आणि आयपीएलच्या अखेरीस शेवटच्या क्रमांकावर फेकला गेला. त्यामुळे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग आणि चेन्नई फ्रँचायझी व्यवस्थापनाने काही महत्त्वाचे निर्णय घेतले. यात अनुभवी देशी किंवा परदेशी खेळाडूंवर विसंबून राहण्यापेक्षा तरुण, ताज्या दमाच्या स्थानिक खेळाडूंमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देण्यात आले. ‘गेल्या हंगामात आम्हाला अनेक बाबी हंगाम अर्ध्यावर आल्यावर कळून चुकल्या. तोपर्यंत उशीर झाला होता. त्यामुळे स्थानिक खेळाडूंचा मजबूत गाभा (कोअर) असावा आणि त्यातूनच दीर्घकालीन यशाची हमी मिळेल असे आम्हाला वाटते. काही वेळा जुन्या विचारांना चिकटून राहावेसे वाटते, कारण आपण जुन्या यशाचाच विचार करत राहतो. यंदा ते बदलले आहे,’ या शब्दांत फ्लेमिंग यांनी बदललेल्या प्रवाहामागील भूमिका सांगितली.

नवख्यांची दिवाळी!

तसे पाहायला गेल्यास हा मिनी-ऑक्शन होता. पण एकही आंतरराष्ट्रीय सामना न खेळलेल्या ‘अनकॅप्ड’ खेळाडूंसाठी तो दिवाळीनंतरची दिवाळी ठरला. यासाठी दीर्घ काळ स्मरणात राहील असाच. औकीब नबी याला दिल्ली कॅपिटल्सनी ८.४ कोटी रुपयांना खरीदले. मंगेश यादव साठी रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरूने ५.२ कोटी रुपये मोजले. तेजस्वी दाहिया (कोलकाता, ३ कोटी), मुकुल चौधरी (लखनऊ, २.६ कोटी), सलील अरोरा (हैदराबाद, १.५ कोटी),अक्षत रघुवंशी (लखनऊ, २.२ कोटी), नमन तिवारी (लखनऊ, १ कोटी) हेदेखील असेच नवखे कोट्यधीश. यांतील नबी, तिवारी हे तेज गोलंदाज, मंगेश यादव हा अष्टपैलू, अक्षत रघुवंशी हा फलंदाज, तर तेजस्वी, मुकुल आणि सलील हे यष्टिरक्षक.        

कोटींची गुंतवणूक फळली किती?

आयपीएल फ्रँचायझी एखाद्या नेमक्या कोणत्या कारणास्तव कोटीच्या कोटी उधळतात हे सर्वसामान्यांसाठी न उलगडणारे कोडे असते. या शंकेत अनेकदा तथ्यही असते. यासाठी यापूर्वी अशा प्रकारे कोट्यधीश नवख्यांची कामगिरी कशी झाली हे तपासणे रंजक ठरते. वरुण चक्रवर्तीला पंजाबने २०१९मध्ये ८.४० कोटी रुपये मोजून करारबद्ध केले. त्या हंगामात तो एकच सामना खेळू शकला. पुढे कोलकाताकडे आल्यानंतर त्याची कारकीर्द बहरली. पण पंजाबच्या संघाला मात्र त्याच्यावरची गुंतवणूक फळली नाहीच.

चेन्नईने २०२१मध्ये ९.२५ कोटी इतकी घसघशीत रक्कम ज्यासाठी ओतली, तो के. गौतम दोनच सामने खेळला. त्याला अष्टपैलू म्हणून घेतला. पण धावा २३ आणि बळी शून्य! २०१८मध्ये कोलकात्याने शिवम मावीसाठी ३ कोटी रुपये मोजले. तो १९ वर्षांखालील जगज्जेत्या संघातून खेळला होता. त्या हंगामात मावी तीन सामने खेळला. बळी एकच मिळाला. २०१८मध्ये कमलेश नागरकोटी ३.२ कोटी रुपयांना कोलकाताकडे करारबद्ध झाला. तो पहिले दोन हंगाम दुखापतीमुळे खेळू शकला नाही आणि त्यासाठी मोजलेले कोटी जवळपास पाण्यात गेले.

राहुल तेवातिया मध्यंतरी गाजला होता. त्याच्यासाठी गुजरातने २०२२मध्ये ९ कोटी रुपये मोजले. त्याची कामगिरी आधीच्यांइतकी सुमार नव्हती. काही सामन्यांत चमक दिसली. पण राजस्थानसाठी २०२०मध्ये एकच इनिंग तो खेळला आणि गाजला, तशी ती त्याला गुजरातसाठी करून दाखवता आली नाही. आवेश खानला (त्यावेळी तो आंतरराष्ट्रीय सामने खेळला नव्हता) लखनऊने २०२२मध्ये १० कोटी रुपयांना करारबद्ध केले. आजच्या प्रशांत-कार्तिक यांच्या आधीचा विक्रमवीर तो होता. पण त्याची अखेरची षटके खूपच महागडी ठरली आणि गुंतवणूक जवळपास वाया गेली.

पवन नेगीसाठी दिल्लीने २०१६मध्ये ८.५ कोटी रुपये मोजली. पण त्याची कामगिरी कधीच उठावदार नव्हती. ‘अनकॅप्ड’ खेळाडूंमध्ये खऱ्या अर्थाने यशस्वी ठरले असे चार जण म्हणजे जसप्रीत बुमरा, हार्दिक पंड्या, सूर्यकुमार यादव आणि हर्षल पटेल. यांतील हर्षल पटेल आयपीएल वर्तुळाच्या बाहेर येऊ शकला नाही. इतर अनेकांबाबत तर तेही म्हणता येत नाही.  

siddharth.khandekar@expressindia.com