पहिल्या पाच षटकांमध्ये २४ वर चार गडी बाद या स्थितीमधून थेट २० धावांनी सामना जिंकत एम. एस. धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सने आपणच कमबॅकचे राजे असल्याचं रविवारी आबु धाबीमध्ये पार पडलेल्या आयपीएलच्या दुसऱ्या सत्रातील मुंबईविरुद्धच्या पहिल्या सामन्यामध्ये दाखवून दिलं. नाणेफेक जिंकलेल्या चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना मुंबईविरोधात २० षटकात ६ बाद १५६ धावा केल्या. चेन्नईचा मराठमोळा फलंदाज ऋतुराज गायकवाडने नाबाद ८८ धावा करत संघाला समाधानकारक धावसंख्या गाठून दिली. या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईची दमछाक झाली. मुंबईच्या फलंदाजांनी चांगली सुरुवात केल्यानंतर एका निर्णायक क्षणी कर्णधार धोनीने घेतलेल्या डीआरएस म्हणजेच डिसीजन रिव्ह्यू सिस्टीमअंतर्गत पंचांनी दिलेल्या निर्णयाला आव्हान दिलं अन् मुंबईला पहिला धक्का बसला. धोनीच्या या निर्णयामुळे क्विंटन डी कॉकला तंबूत परतावं लागलं.

नक्की पाहा >>Video : यॉर्कर स्पेशलिस्ट बुमराहला शेवटच्या चेंडूवर ऋतूराजने लगावलेला ‘नाद खुळा’ षटकार पाहिलात का?

झालं असं की, तिसऱ्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर दिपक चहरचा चेंडू खेळताना क्विटन डी कॉक गोंधळला अन् यष्ट्यांसमोर असतानाच चेंडू त्याच्या पॅडला आदळला. अपिल केल्यानंतरही पंचांनी त्याला नाबाद ठरवल्यानंतर धोनीने लगेच डिआरएसची मदत घेण्याचा निर्णय घेतला. तिसऱ्या पंचांनी डीआरएसमध्ये तपासणी केली असता चेंडूचा बॅटचा स्पर्श न होता तो क्विटनच्या पॅड्सवर आदळल्याचं स्पष्ट झालं. चेंडू अगदी योग्य होता आणि तो थेट डावखुऱ्या हाताने फलंदाजी करणाऱ्या क्विटनच्या ऑफ स्टम्पचा वेध घेत असल्याचं डीआरएसमध्ये दिसून आलं. धोनीच्या या निर्णयानंतर अनेकांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केलाय. धोनी हा डीआरएससंदर्भात अचुक निर्णय घेण्यासाठी ओळखला जातो.

पंचांची प्रतिक्रिया अशी असावी

तो जेव्हा डीआरएस घेतो

चेन्नई पहिल्या स्थानी…

नक्की वाचा >> IPL 2021 : गुणतालिकेमध्ये धोनीचा संघच ‘सुपर किंग्स’ तर मुंबई…; पाहा CSK vs MI सामन्यानंतरचं Points Table

या विजयासह चेन्नईने गुणतालिकेत १२ गुणांसह पहिले स्थान मिळवले आहे. सध्या गुणतालिकेमध्ये आठ सामन्यांपैकी सहा सामन्यांमध्ये विजय मिळवत १.२२३ च्या रनरेटने चेन्नईचा संघ पहिल्या स्थानी आहे. दिल्लीनेही आठपैकी सहा सामने जिंकले असले तरी तरी त्यांचा रनरेट ०.५४७ इतका असल्याने ते दुसऱ्या स्थानी आहेत. तिसऱ्या स्थानी सात सामन्यांपैकी पाच सामने जिंकणारा विराट कोहलीचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ आहे. मुंबईच्या संघाने पराभवानंतरही आपलं चौथ्या क्रमांकावरील स्थान कायम राखलं आहे. मुंबईने आठपैकी चार सामने जिंकलेत तर चार गमावले आहेत. राजस्थान रॉयल्सने सातपैकी तीन सामने जिंकलेत तर पंजाबला आठपैकी तीन सामन्यांमध्ये विजय मिळवता आलाय. हे संघ अनुक्रमे पाचव्या आणि सहाव्या स्थानी आहेत. सातव्या स्थानी दोन विजयांसहीत कोलकाता नाईट रायडर्सचा संघ आहे तर आठव्या स्थानी एका विजयासहीत सनराईजर्स हैदराबादचा संघ आहे.