टेस्ट क्रिकेट संपत चाललंय, संपणार या चर्चा सुरू असतानाच आयपीएलचे संस्थापक ललित मोदी यांनी या प्रकाराला संजीवनी देण्यासाठी अनोखा मार्ग सांगितला आहे. टेस्ट क्रिकेटला वाचवता येऊ शकतं. आयपीएल फ्रँचाइजींनी कसोटी संघ विकत घ्यायचे. जेणेकरून युवा खेळाडू या प्रकाराकडे आकर्षित होतील. याद्वारे टेस्ट क्रिकेट ज्या पद्धतीने रसातळाला चाललं आहे ते वाचवता येईल. ललित मोदी यांनी इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू मायकेल वॉन बरोबरच्या ‘द ओव्हरलॅप पॉडकास्ट’ या मुलाखतीत ही सूचना मांडली.
‘आयपीएल फ्रँचाइजी ज्या पद्धतीने जगभरात विविध टी२० लीगमध्ये संघ विकत घेतात त्याच धर्तीवर त्यांनी टेस्ट संघ विकत घ्यावे. टेस्ट क्रिकेट सुरू राहण्यासाठी प्रदर्शनीय सामने खेळवण्यात यावेत. आयपीएल फ्रँचाइजींनी संघ विकत घेतले तरी दोन देशांमधील सामन्यांना सर्वोच्च प्राधान्य असेल’, असं मोदी म्हणाले.
टेस्ट चार दिवसांच्या आणि डे नाईट व्हाव्यात
‘टेस्ट मॅचेस चार दिवसांच्या करण्यात याव्यात. टेस्ट मॅचेस डे नाईट खेळवण्यात याव्यात. कारण चाहत्यांकडे अख्खा दिवस टेस्ट मॅच पाहायला वेळ नाही. माणूस नोकरी-व्यवसाय यात गुंतलेला असतो. प्रवासातही वेळ जातो. त्याला कुटुंबीयांना वेळ द्यायचा असतो. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा की प्रेक्षकासमोर पाहण्यासाठी प्रचंड कंटेट उपलब्ध आहे. त्याच्याकडे खंडीभर पर्याय आहेत आणि वेळ कमी आहे. अटेंशन स्पॅन कमी आहे. क्रिकेटची स्पर्धा फुटबॉल, रग्बी यांच्याशी आहे. टेस्ट क्रिकेटची स्पर्धा फक्त यांच्याशी नाहीये तर टी२० प्रकाराशीही आहे. अशा परिस्थितीत टेस्ट क्रिकेट ओढगस्तीला लागू शकतं. तरुणपणीच टेस्ट क्रिकेटची गोडी लागू शकते. टेस्ट क्रिकेट विकायचं’, असं मी म्हणत नाहीये.
‘टेस्ट क्रिकेट अस्तंगत होतंय असं नुसतं बोलून चालणार नाही. त्यासाठी वेगळा विचार करावा लागेल. माझ्या डोक्यात एक योजना आहे. मी हे सांगितल्यावर काही लोक जोरदार टीका करतील. आयपीएल संघांना टेस्ट टीम विकत घेण्याची मुभा देण्यात यावी. आयपीएल संघांकडे युवा खेळाडूंची मोठी फौज आहे. आयपीएल संघांकडे बांधिलकी आहे. दोन देशांमधील सामने सुरू राहतीलच. ते बंद होणार नाहीत. त्याला सर्वोच्च प्राधान्य असेल. टेस्ट क्रिकेट एखाद्या वर्ल्ड चॅम्पियनशिप प्रमाणे चालवण्यात यावं. दरवर्षी नवा विजेता मिळेल’.
‘दोन देशांमधील सामने सुरू राहतील पण त्याचवेळी प्रदर्शनीय सामने खेळवण्यात यावेत. आयपीएल फ्रँचाइजींनी संघ विकत घेतला तर युवा खेळाडूंना पाचदिवसीय प्रकारात खेळता येईल. क्लब क्रिकेटप्रमाणे संघांदरम्यान सामने होतील. युवा खेळाडू मोठ्या फॉरमॅटसाठी तयार होतील. प्रत्येक खेळात क्लब संरचना आहे, पण देशांदरम्यानचे सामने सुरू राहतात. तसंच क्रिकेटमध्येही व्हावं. युवा खेळाडूंना टेस्ट क्रिकेटची गोडी लागावी यासाठी हे करणं गरजेचं आहे. टेस्ट क्रिकेट आव्हानात्मक फॉरमॅट आहे. पाच दिवस सातत्याने चांगलं खेळणं सोपं नाही. ते खेळण्यासाठी युवा मंडळी तयार होतील. ते फ्रँचाइजींशी बांधील आहेत. त्यांना टेस्ट क्रिकेटचा आनंद घेता येईल’.
‘टेस्ट क्रिकेट पाहण्यासाठी चाहत्यांकडे वेळ नाही आणि संयमही नाही. पूर्वीच्या काळी आयु्ष्याचा वेग कमी होता. संसाधनं मर्यादित होती आणि क्रिकेटही कमी खेळलं जायचं. आता तसं नाही. आता पाच दिवस उन्हात जाऊन, बीअर पीत सामना पाहण्याएवढा वेळ लोकांकडे नाही. हे ऐकून काहींना वाईट वाटेल. पूर्वीचे दिवस रमणीय होते. टीव्हीवर एकच चॅनल असायचं. टेस्ट मॅचेसची संख्याही अतिशय मोजक्याच व्हायच्या. मीडिया सगळीकडे पोहोचलं नव्हतं. आता दररोज जगात एकाचवेळी अनेक सामने सुरू असतात. एकाच देशाच्या दोन टीम्स खेळत असतात. जगात कुठेही क्रिकेटचा सामना सुरू असेल तर तो तुम्हाला घरबसल्या पाहायला मिळतो’.
अॅशेसमुळे टेस्ट क्रिकेट जिवंत
‘टेस्ट क्रिकेट जिवंत राहील, पण त्याची लोकप्रियता कमी होत आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात रंगणाऱ्या अॅशेस मालिकेमुळे टेस्ट क्रिकेटमधली रंजकता टिकून राहिली आहे. बाकी देशांमध्ये मात्र टेस्ट क्रिकेट नामशेष होण्याच्या वाटेवर आहे’, असं मोदी यांना वाटतं. पण ते पुढे सांगतात की, ‘मला आशा आहे की टेस्ट क्रिकेट जिवंत राहील. मला स्वत:ला टेस्ट क्रिकेट अतिशय आवडतं. पण आता मोठं होत असलेल्या पिढीचाही विचार करा. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड या संघांचे सामने सोडले तर तुल्यबळ असे सामने त्यांना पाहायला मिळतात का?याचं उत्तर नाही असंच आहे. भारतात होणाऱ्या टेस्टमध्ये भारताचं वर्चस्व असतं. गेले दशकभर भारतीय फिरकीपटूंनी प्रतिस्पर्धी संघाला निष्प्रभ केले. ऑस्ट्रलिया-इंग्लंड अॅशेस मालिका प्रचंड लोकप्रिय आहे. पाचव्या दिवशी, शेवटच्या सत्रापर्यंत उत्कंठा कायम राहते. यामुळे टेस्ट मॅचेसचा स्तर चांगला राहिला आहे. पण हे दोनच देशांपुरतं मर्यादित आहे. अन्य देशात परिस्थिती टेस्ट क्रिकेट एकसुरी आणि कंटाळवाणं होत आहे’.
‘एखादा खेळाडू वर्षभरात १०५ दिवस खेळू शकतो. दुखापती, बाकी तब्येत हे सगळं लक्षात घेता खेळाडू एवढेच दिवस खेळू शकतो. खेळाडूसाठी देशासाठी खेळणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यानंतर डोमेस्टिक स्पर्धा खेळणार. हे दोन्ही मिळून ८० दिवस पकडूया. खेळाडूंची कारकीर्द अल्प असते. फारच कमी खेळाडू १५ वर्षांहून अधिक काळ खेळतात. खेळाडूला तो स्वत:, त्याची पत्नी, दोन मुलं असं घर चालवायचं असतं. पस्तिशी-चाळिशीनंतर रोजीरोटीचं माध्यम काय असणार हे त्याला ठरवावंच लागेल. दोन महिने खेळून १६ मिलिअन का वर्षभर खेळून १ मिलिअन- हा निर्णय त्याला करायचा आहे. प्रत्येक बोर्डाला निर्णय घ्यायचा आहे. कमाईतला २६ टक्के हिस्सा त्यांनी खेळाडूंना द्यावा. आयपीएलची रचना पहिल्यापासूनच वेगळी आहे’.
छोट्या संघांना पैसा द्या
‘वेस्ट इंडिज, श्रीलंका, न्यूझीलंडच्या खेळाडूंना राष्ट्रीय संघाकडून खेळण्यासाठी फारसे पैसे मिळत नाहीत. पाकिस्तान, झिम्बाब्वे, अफगाणिस्तान, बांगलादेश यांच्या खेळाडूंना तर बोर्डाकडून तुंटपुंजी रक्कम मिळते. आयपीएल खेळाडूंना आर्थिक स्थैर्य मिळवून देतं. फुटबॉलमध्ये खेळाडू देशाकडून खेळतात पण ते प्रमाण मर्यादित असतात. ते वर्ल्डकप स्पर्धेत देशाचं प्रतिनिधित्व करतात. ऑलिम्पिक स्पर्धेत देशाचं प्रतिनिधित्व करतात. क्रिकेटमध्ये दोन देशांदरम्यानच्या मालिका खूप होतात. त्यांचं प्रमाण कमी होईल’, असं मोदी म्हणाले.
मोदी यांना असंही वाटतं की, ‘टेस्ट क्रिकेटसाठी व्ह्यूअरशिप मिळवावी लागेल. आयसीसीने वर्ल्डकपची संख्या वाढवली आहे. आता जवळपास दरवर्षी कुठला ना कुठला वर्ल्डकप असतो. या माध्यमातून जो पैसा येतो तो आयसीसीकडे जातो किंवा बोर्डाकडे जातो. आयसीसीने त्यांना मिळणाऱ्या कमाईचं वाटप चांगल्या पद्धतीने करायला हवं. भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड या मोठ्या बोर्डांना पैशासाठी आयसीसीची गरज नाही. यंदाच्या टी२० वर्ल्डकपमध्ये इटलीचा संघ होता. नेपाळ, अमेरिकेचे संघ होते. त्यांच्याकडे पैसे नाहीयेत. त्यांच्याकडे स्पर्धांची ठोस संरचना नाहीये. त्यांना निधी मिळायला हवा’.
