‘आयपीएल स्पर्धा हॉलिडे ब्रेकसारखी आहे. ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट हंगामात या काळात फारसं क्रिकेट खेळलं जात नाही. त्यामुळे आयपीएल हॉलिडे ब्रेकसारखं आहे. माझ्यासाठी ऑस्ट्रेलियासाठी कसोटी खेळणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे’, असं सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने म्हटलं आहे. जगभरातील टी२० लीगमध्ये खेळण्यासाठी कमिन्सचं नाव चर्चेत असतं. मात्र तो ऑस्ट्रेलियाचा टेस्ट आणि वनडे कर्णधार आहे आणि प्रमुख गोलंदाजही आहे. त्यामुळे त्याला सगळ्या टी२० लीगमध्ये खेळणं शक्य होत नाही. कमिन्सला कारकिर्दीत सुरुवातीपासूनच दुखापतींनी सतवलं आहे. त्यामुळे त्याला वर्कलोड मॅनेजमेंट काळजीपूर्वक जपावं लागतं. कमिन्सने ऑस्ट्रेलियासाठीच खेळावं यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून त्याला मोठ्या रकमेचा कराराचा प्रस्ताव दिल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. वेस्ट इंडिजच्या क्रिकेटपटूंप्रमाणे कमिन्सने फ्रीलान्स पर्याय स्वीकारत जगभरातील टी२० लीगमध्ये खेळण्याचा पर्याय स्वीकारला तर ऑस्ट्रेलियाच्या संघाचं नुकसान होऊ शकतं म्हणून मोठ्या रकमेचा प्रस्ताव दिल्याचं वृत्त समोर आलं होतं.
पुढची काही वर्ष तरी ऑस्ट्रेलियासाठी खेळणं हेच माझं प्राधान्य असेल असं कमिन्सने दिल्लीत एका कार्यक्रमादरम्यान बोलताना सांगितलं. सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार असलेला कमिन्स यंदाच्या हंगामात सुरुवातीच्या ७ लढतीत खेळू शकला नाही. वर्कलोड मॅनेजमेंटचा भाग म्हणून तसंच दुखापतीतून सावरत असल्याने कमिन्स हैदराबादच्या सुरुवातीच्या सामन्यांसाठी उपलब्ध नव्हता. दरम्यान आयपीएलचा भाग असल्यामुळे कमिन्स ऑस्ट्रेलियाच्या पाकिस्तान आणि बांगलादेश दौऱ्याचा भाग होऊ शकणार नाही. ऑगस्ट २०२६ ते ऑगस्ट २०२७ या वर्षभरात कमिन्सला २० कसोटी सामने खेळायचे आहेत. ते लक्षात घेता क्रिकेट ऑस्ट्रेलियाने कमिन्सचा पाकिस्तान आणि बांगलादेश दौऱ्यासाठी विचारच केला नाही.
ऑस्ट्रेलियासाठी खेळणं, बिग बॅश स्पर्धेत सहभाग याबाबत ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूंच्या प्राधान्याबाबत सातत्याने चर्चा होते आहे. ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’ने दिलेल्या करार रकमेवर पाच वरिष्ठ खेळाडू खूश नसल्याचं स्पष्ट झालं होतं. कमिन्सने ‘बिझनेस ऑफ स्पोर्ट्स’ पॉडकास्ट कार्यक्रमात यासंदर्भात आपली मतं मांडली होती. ऑस्ट्रेलियाला ऑगस्ट महिन्यात बांगलादेशविरुद्ध दोन कसोटी सामने खेळायचे आहेत. या मालिकेत खेळायचं असेल तर ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना इंग्लंडमध्ये होणाऱ्या द हंड्रेड स्पर्धेत खेळता येणार नाही. द हंड्रेड स्पर्धेत न खेळल्यामुळे खेळाडूंना ६७५,००० ऑस्ट्रेलियन डॉलर्स कमाईवर पाणी सोडावं लागेल हा बोर्ड आणि खेळाडू यांच्यातील वादाचा मुद्दा होता.
दिल्लीत एका कार्यक्रमात बोलताना मात्र कमिन्सने ऑस्ट्रेलियासाठी खेळणं हेच प्राधान्य असल्याचा पुनरुच्चार केला. ‘कसोटी संघाचा कर्णधार म्हणून उपलब्ध नसणं मला पटणारं नाही. दुखापतग्रस्त असेन तर नाईलाज आहे पण अन्यथा ऑस्ट्रेलियासाठी कसोटी खेळण्याला सर्वोच्च प्राधान्य असेल. ऑस्ट्रेलियाच्या हंगामाच्या सुट्ट्यांच्या काळात आयपीएल होतं. त्यामुळे आम्हाला या स्पर्धेत खेळणं सुकर होतं. त्यानंतर मी पुन्हा ऑस्ट्रेलियासाठी खेळण्यावर लक्ष केंद्रित करतो’, असं कमिन्स म्हणाला.
पारंपरिक प्रतिष्ठेच्या अॅशेस मालिकेत कमिन्स केवळ एका कसोटीत खेळू शकला. पाठीच्या दुखण्यामुळे तो ५ पैकी केवळ एका सामन्यात खेळला. गेल्या दोन वर्षात दुखापतींमुळे तसंच कसोटीवर लक्ष केंद्रित केल्यामुळे वनडे आणि टी२० स्पर्धांना मुकावे लागले आहे. कमिन्सच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाने २०२३ वनडे वर्ल्डकपवर नाव कोरलं. मात्र त्यानंतर कमिन्स ऑस्ट्रेलियासाठी केवळ दोन वनडे खेळू शकला आहे. २०२४ टी२० वर्ल्डकपनंतर कमिन्स ऑस्ट्रेलियासाठी टी२० खेळलेला नाही. त्यानंतर तो मेजर लीग क्रिकेट स्पर्धेत खेळला.
कमिन्सला पाठीच्या दुखण्याने सातत्याने त्रस्त केलं आहे. ‘गेल्या चार महिन्यांपासून मला ताजंतवानं वाटत आहे. कारण मी फारसं खेळलोच नाहीये. गेल्या सहा सात वर्षात इतकं ऊर्जामय मला वाटलेलंच नाही. ऑस्ट्रेलियाचं पुढचं वेळापत्रक लक्षात घेऊन मी विश्रांती घेतली. पाठीत स्ट्रेस फ्रॅक्चर हा त्रास सातत्याने उदभवतो. तो पुन्हा डोकं वर काढू नये यासाठी मी पुरेशी विश्रांती घेणं आवश्यक आहे. अन्यथा मला पुढचं वर्षभर कसोटी क्रिकेट खेळता येणार नाही. शारीरिकदृष्ट्या आता मी फिट आहे. माझी पाठ आता उत्तम आहे. रिहॅब प्रक्रियेसाठी मी पूर्ण वेळ दिला’, असं त्याने सांगितलं.
आयपीएलच्या २०२७ हंगामाच्या पार्श्वभूमीवर कमिन्स, क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सविस्तर चर्चा होणार आहे. डिसेंबर ते मार्चच्या मध्यापर्यंत ऑस्ट्रेलिया सलग १० कसोटी सामने खेळणार आहे. यापैकी ५ भारतात असणार आहेत. ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये धडक मारल्यास कमिन्सला तो सामनाही खेळायचा आहे. त्यानंतर पारंपरिक अॅशेस मालिकेत खेळायचं आहे. कमिन्स २०२३ आयपीएलमध्ये खेळला नव्हता कारण त्यावेळीही ऑस्ट्रेलियाचं वेळापत्रक असंच भरगच्च होतं. ऑस्ट्रेलियाचा अनुभवी वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कही २०२३ आयपीएलमध्ये सहभागी झाला नव्हता.
बिग बॅश स्पर्धेच्या खाजगीकरणाबद्दल कमिन्सने भाष्य केलं नाही. ‘हा क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा निर्णय असेल. स्पर्धेचा परीघ वाढावा, अधिकाअधिक चाहत्यांना खेळ पाहता यावा, युवा खेळाडूंना कर्तृत्व दाखवण्यासाठी व्यासपीठ मिळावं असं आम्हाला वाटतं’, असं कमिन्स म्हणाला. २०१९ नंतर कमिन्स बिग बॅश स्पर्धेत खेळला नाहीये. पुढच्या वर्षीही वर्कलोड मॅनेजमेंटमुळे खेळू शकणार नाही.
फ्रीलान्स क्रिकेटपटू म्हणजे काय?
क्रिकेटपटू आपल्या देशाच्या बोर्डाशी करारबद्ध असतात. कराराचा भाग म्हणून राष्ट्रीय संघासाठी खेळणे आणि निवडीसाठी उपलब्ध राहणे अनिवार्य असते. कोणत्याही संघाचं वर्षभराचं वेळापत्रक भरगच्च स्वरुपाचं असतं. याऐवजी खेळाडूंनी नवीन पर्याय आजमावताना दिसत आहेत. देशासाठी वर्षभर खेळण्याऐवजी ठराविक महिने जगभरातल्या टी२० लीगमध्ये खेळायचं आणि उरलेला वेळ कुटुंबाला द्यायचा असा खेळाडूंचा विचार असतो. जवळपास प्रत्येक देशात आणि प्रत्येक महिन्यात एक टी२० लीगचं आयोजन होतं. वर्षभराची पुंजी सहा महिन्यात कमवायची आणि बाकी वेळ घरच्यांना द्यायचं हे धोरण न्यूझीलंडच्या क्रिकेटपटूंनी अवलंबलं आहे. याचाच भाग म्हणून ट्रेंट बोल्ट, केन विल्यमसन आणि डेव्हॉन कॉनवे यांनी न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाचा करार स्वीकारलेला नाही. हे खेळाडू देशासाठी खेळण्यासाठी कधी उपलब्ध असणार ते सांगतात त्यानुसार त्यांची निवड होते मात्र कराराचा भाग नसल्याने न्यूझीलंडसाठी प्रत्येक सामना खेळणं त्यांना बंधनकारक नाही.
जगभरात किती लीग?
आयपीएलच्या बरोबरीने पाकिस्तान सुपर लीग, लंका प्रीमिअर लीग, कॅरेबियन प्रीमिअर लीग, बिग बॅश, SA20, बांगलादेश प्रीमिअर लीग, ग्लोबल टी२०, मेजर लीग क्रिकेट, आयएलटी२०, द हंड्रेड, व्हायटॅलिटी ब्लास्ट अशा लीग सुरू आहेत. आणखीही काही लीग सुरू होण्याच्या मार्गावर आहेत.
