IPL 2025 Suspended Breaking News Updates : भारत पाकिस्तान सीमांवरच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल स्पर्धा स्थगित होण्याची चिन्हं होती. जी चिन्हं आता प्रत्यक्षात उतरली आहेत. या स्पर्धेला स्थगिती देण्यात आली आहे. भारत सरकारशी सल्लामसलत केल्यानंतर बीसीसीआयने याबाबत अधिकृत दुजोरा दिला असून, ही स्पर्धा पुढे ढकलण्याची योग्य वेळ नाही आणि खेळाडूंच्या सुरक्षेशी तडजोड होणार नाही हे पाहणं महत्त्वाचं असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर आता आयपीएलची स्पर्धा स्थगित करण्यात आली आहे.
स्पर्धा स्थगित होण्याचीच चिन्हं जास्त
धरमशाला येथे झालेल्या ब्लॅक आऊटमुळे पंजाब किंग्जचा दिल्ली कॅपिटल्सविरुद्धचा सामना पहिल्या डावातच रद्द करण्यात आल्यापासून आयपीएलच्या उर्वरित स्पर्धेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं. याआधी मिळालेल्या माहितीनुसार यापूर्वी मिळालेल्या वृत्तानुसार, बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सकाळी सरकारशी चर्चा केली. आणि सध्या तरी त्यांनी आयपीएल स्थगित करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. “आम्हाला भविष्याबद्दल खात्री नाही. बरीच संदिग्धता असल्याने पुढे काय होईल हे सांगता येत नाही. तूर्तास वाट पहावी लागेल,’ असे बोर्डातील सूत्रांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं आहे. त्यामुळे ही स्पर्धा स्थगित होण्याची चिन्हं जास्त होती. ज्यानुसार ही स्पर्धा म्हणजेच उर्वरित १६ सामने हे स्थगित करण्यात आले आहेत.
११ मेच्या सामन्याचं काय झालं?
भारत पाकिस्तान संघर्षाच्या पार्श्वभूमीवर धरमशाला इथे ११ तारखेला होणारा मुंबई-पंजाब सामना अहमदाबाद इथे खेळवण्यात येईल असं स्पष्ट करण्यात आलं होतं. धरमशालाचा विमानतळ बंद करण्यात आल्याने मुंबईच्या संघाला तिथे पोहोचणं शक्य नव्हतं. मात्र दिल्ली-पंजाब दोन्ही संघ धरमशाला इथे असल्याने गुरुवारची लढत आयोजित करण्यात आली. यंदाच्या हंगामातला हा ५८वा सामना होता.
तूर्तास या हंगामातील १६ लढती बाकी आहेत. उर्वरित सामने कुठे होणार यासंदर्भातील निर्णय जाहीर करण्यात आलेला नव्हता. करोना काळात आयपीएल संयुक्त अरब अमिराती इथे खेळवण्यात आली होती. मात्र सध्याच्या परिस्थितीत स्पर्धेला स्थगिती देण्यात आली आहे. दरम्यान भारत-पाकिस्तान संघर्षाची परिस्थिती लक्षात घेऊन पाकिस्तानात सुरू असलेली पाकिस्तान सुपर लीगचे उर्वरित सामने संयुक्त अरब अमिराती इथे होण्याची शक्यताही वर्तवली जात होती. मात्र भारत पाकिस्तानचा संघर्ष लक्षात घेता या स्पर्धेला स्थगिती देण्यात आली आहे.