‘आयपीएल’साठी मर्यादित प्रेक्षकांना परवानगी

जैव-सुरक्षित परिघात करोनाचा शिरकाव झाल्यामुळे मे महिन्यात ‘आयपीएल’ स्थगित करण्यात आले.

नवी दिल्ली : संयुक्त अरब अमिरातीमध्ये रविवारपासून सुरू होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटच्या दुसऱ्या टप्प्यात स्टेडियममध्ये मर्यादित प्रेक्षकांना परवानगी देण्यात येणार आहे, अशी घोषणा संयोजकांनी केली आहे.

जैव-सुरक्षित परिघात करोनाचा शिरकाव झाल्यामुळे मे महिन्यात ‘आयपीएल’ स्थगित करण्यात आले. येत्या रविवारी गतविजेते मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात दुबई क्रिकेट स्टेडियमवर होणाऱ्या लढतीने ‘आयपीएल’ला प्रारंभ होणार आहे.

‘‘करोनाविषयक शिष्टाचार आणि अमिरातीमधील सरकारचे नियम या पार्श्वभूमीवर दुबई, शारजा आणि अबू धाबी येथील सामन्यांना मर्यादित प्रेक्षकसंख्या निश्चित करण्यात आली आहे. १६ सप्टेंबरपासून ‘आयपीएल’च्या अधिकृत संकेतस्थळावर प्रेक्षकांना तिकीट उपलब्ध होऊ शकेल,’’ असे ‘आयपीएल’ संयोजकांनी म्हटले आहे. २०१९नंतर प्रथमच ‘आयपीएल’ सामने प्रेक्षकांच्या साक्षीने होणार आहेत. गतवर्षी ही लीग अमिरातीमध्ये बंदिस्त स्टेडियमवर खेळवण्यात आली. २०२१मध्ये जैव-सुरक्षित परिघात हंगामाला प्रारंभ झाला. पण खेळाडूंना करोनाची लागण झाल्यामुळे हंगाम स्थगित झाला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Ipl limited spectators allowed in the stadium infiltration of the corona into the bio safe perimeter akp