गेल्या वर्षीच्या लिलावानंतर आयपीएस संघांचं चित्र स्थिर झालं असं वाटत असतानाच मिनी ऑक्शन होऊ घातलं आहे. १६ डिसेंबर रोजी होणाऱ्या या लिलावात साडेतीनशे खेळाडू असतील. बीसीसीआयने यासंदर्भात पत्रकाद्वारे माहिती दिली आहे. हजारहून अधिक खेळाडूंची यादी कमी करून बीसीसीआयने साडेतीनशे खेळाडूंना सामावून घेतलं आहे. अबू धाबी इथे मिनी ऑक्शन होणार आहे.
वेंकटेश अय्यर, रवी बिश्नोई यांच्यासह ४० खेळाडूंनी त्यांची बेस प्राईज २ कोटी रुपये ठेवली आहे. अष्टपैलू कॅमेरुन ग्रीनसाठी मोठी बोली लागण्याची शक्यता आहे. क्विंटन डी कॉक, जॉर्ज लिंड आणि दुनिथ वेलागे यांचा अंतिम यादीत समावेश करण्यात आला आहे. फ्रँचाइजींच्या विनंतीनंतर ३५ खेळाडूंचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. क्विंटन डी कॉक याने अलीकडेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून घेतलेल्या निवृत्तीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. भारताविरुद्धच्या तिसऱ्या वनडेत क्विंटनने खणखणीत शतकी खेळी साकारली होती.
साडेतीनशे खेळाडूंपैकी २४० भारतीय तर ११० विदेशी खेळाडू आहेत.
खेळाडूंचं बॅट्समन, ऑलराऊंडर, विकेटकीपर बॅट्समन, फास्ट बॉलर आणि स्पिन बॉलर असं वर्गीकरण करण्यात आलं आहे.
१० संघ मिळून ७७ खेळाडूंची खरेदी होणं अपेक्षित आहे. यापैकी ३१ विदेशी खेळाडू असतील. लिलावात कोलकाता नाईट रायडर्सकडे सर्वाधिक म्हणजे ६४.३० कोटी एवढी प्रचंड रक्कम उपलब्ध असेल.

