किंग्ज इलेव्हन पंजाबचे सहमालक नेस वाडिया यांचा ‘बीसीसीआय’कडे प्रस्ताव

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) नव्या हंगामापासून प्रत्येक सामन्याला भारताच्या राष्ट्रगीताने सुरुवात करावी, असा प्रस्ताव किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचे सहमालक नेस वाडिया यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळापुढे (बीसीसीआय) गुरुवारी ठेवला.

साधारणपणे ‘आयसीसी’च्या स्पर्धामध्ये राष्ट्रगीताने सामन्यांना सुरुवात होते. परंतु ‘आयपीएल’ ही विश्वातील अव्वल क्रमांकाची क्रिकेट लीग असल्यामुळे वाडिया यांनी ‘बीसीसीआय’ला याविषयी विचारणा केली आहे. ‘‘बीसीसीआयने ‘आयपीएल’च्या उद्घाटन सोहळ्यावर पैसे खर्च न करण्याचा निर्णय घेऊन अतिशय योग्य काम केले आहे. उद्घाटन सोहळ्यात अनावश्यक खर्च केला जातो, असे मला नेहमीच वाटते. परंतु याबरोबरच बीसीसीआयने ‘आयपीएल’च्या सामन्यांना भारताच्या राष्ट्रगीताने सुरुवात करावी, असे माझे मत आहे,’’ असे वाडिया म्हणाले.

‘‘याप्रकरणी मी बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीला पत्र लिहिले असून लवकरच त्यांच्याकडून यावर सकारात्मक प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा आहे,’’ असेही वाडिया यांनी सांगितले.

प्रो कबड्डी लीगमध्ये प्रत्येक सामन्यापूर्वी भारताचे राष्ट्रगीत वाजवण्यात येते. त्याचप्रमाणे एनबीए बास्केटबॉल लीगमध्येसुद्धा अमेरिकेच्या राष्ट्रगीताने सामन्यांना सुरुवात होते. दरम्यान रविचंद्रन अश्विन पुढील हंगामात दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणार असल्याचे पक्के झाल्याने वाडिया यांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.