इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळासाठी (बीसीसीआय) आजचा दिवस (१३ जून) ऐतिहासिक ठरण्याची शक्यता आहे. मुंबईत सुरू असलेल्या आयपीएल माध्यम हक्क लिलावाच्या प्रक्रियेचा आज दुसरा दिवस आहे. कदाचित आज सायंकाळपर्यंत संपूर्ण लिलाव प्रक्रिया पूर्ण होऊ शकते. या लिलाव प्रक्रियेच्या पूर्वसंध्येला भारतीय क्रिकेट नियामक मंडळामध्ये उत्साहाचे वातावरण तयार झाले होते. प्रति सामना प्रसारण शुल्काच्याबाबतीत आयपीएल दुसऱ्या स्थानावर जाईल, असा बीसीसीआयला विश्वास होता. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी तसे उघडपणे बोलूनही दाखवले होते. त्यांचा हा विश्वास खरा लिलावाच्या पहिल्या दिवशा खरा ठरला. प्रति सामना प्रसारण शुल्काच्या बाबतीत आयपीएलने इंग्लिश प्रीमियर लीगला (ईपीएल) मागे सारले आहे.

लिलावाच्या पहिल्या दिवशी (१२ जून) क्रिकेट मंडळाच्या खिशात ४३, हजार ५० कोटी रुपयांची भर पडली. म्हणजेच आयपीएलचे प्रति सामना मूल्य १०४ कोटी (१३.४ दसलक्ष) रुपयांच्या वरती गेले. हे मुल्य मागील इंग्लिश प्रीमियर लीगमधील सामन्यांपेक्षा जास्त आहे. ईपीएलमधील प्रत्येक सामन्यासाठी ११ दसलक्ष रुपये मुल्य मिळाले होते. त्यामुळे, प्रति सामना मूल्याच्या बाबतीत आयपीएलने एक नवीन उंची गाठली आहे. अमेरिकेतील राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेनंतर (एनएफएल) आता आयपीएलचा दुसरा क्रमांक लागला आहे. ई-लिलावाच्या दुसऱ्या दिवशीही राहिलेल्या दोन पॅकेजसाठी मोठी किंमत मिळण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – IND vs SA T20 Series : भारतीय संघाला कोहली, रोहित शर्मा आणि बुमराहची अनुपस्थिती मारक ठरतेय का?

आयपीएल माध्यम हक्कांची बहुप्रतीक्षित बोली रविवारी सकाळी ११ वाजण्याच्या आसपास सुरू झाली. पहिल्या दिवशी चार पैकी दोन पॅकेजवर बोली लागली गेली. व्हायकॉमचे जेव्ही, डिस्ने प्लस हॉटस्टार, कल्व्हर मॅक्स एंटरटेन्मेंट (सोनी पिक्चर्स) आणि झी ग्रुप यांनी सुरुवातीला बोली लावली. रविवारी संध्याकाळी सहा वाजता लिलाव प्रक्रिया थांबवण्यात आली. तेव्हा पॅकेज एसाठी ५७ कोटी रुपये आणि पॅकेज बीसाठी ४८ कोटी रुपयांची बोली लागलेली होती.

याचा अर्थ दोन्ही पॅकेजसाठी एकूण १०४ कोटी रुपये मिळाले. ही रक्कम २०१८ ते २०२२ या कालावधील माध्यम हक्कांच्या तुलनेत फारच जास्त आहे. त्यावेळी स्टार इंडियाने प्रत्येक आयपीएल सामन्यासाठी ५४.५ कोटी रुपये मोजले होते. सध्याच्या ई-लिलावात दुसऱ्या दिवशी मोठ्या प्रमाणात हालचाल होण्याची शक्यता आहे. याआधीच पॅकेज सी आणि डीला चांगली बोली लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही संपूर्ण लिलाव प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत एकूण रक्कम ५५ हजार कोटींच्या पुढे जाऊ शकेल असा विश्वास क्रिकेट मंडळाला आहे. काहींच्या मते हा आकडा ६० हजार कोटी रुपयांपर्यंत जाईल.