IPL Playoffs Qualification Scenario: आयपीएल २०२६ स्पर्धा आता शेवटच्या टप्प्यात आहे. स्पर्धेतील ६८ वा सामना लखनौ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. लखनौचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून आधीच बाहेर पडला होता. पण पंजाबला प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी हा सामना जिंकणं अतिशय महत्वाचं होतं. या सामन्यात लखनौने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांअखेर ६ गडी बाद १९६ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना श्रेयस अय्यरने १०१ धावांची शतकी खेळी केली. यासह दिलेलं आव्हान १८ षटकांमध्ये पूर्ण केलं. दरम्यान या सामन्यानंतर कोणत्या संघासाठी कसं आहे प्लेऑफमध्ये जाण्याचं समीकरण? समजून घ्या.

पंजाब किंग्स संघाला प्लेऑफमध्ये जाण्यासाठी आणि टॉप २ मध्ये राहण्यासाठी प्रबळ दावेदार मानलं जात होतं. पण लागोपाठ ६ सामने गमावल्यामुळे पंजाबचा संघ मागे पडला. पंजाबचे साखळी फेरीतील सामने पूर्ण झाले आहेत, पण पंजाबचा संघ अजूनही प्लेऑफमध्ये प्रवेश करु शकलेला नाही. आतापर्यंत झालेल्या १४ पैकी ७ सामन्यांमध्ये पंजाबने विजय मिळवला आहे. तर ६ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. यादरम्यान एक सामना पावसामुळे रद्द झाला होता. सध्या पंजाबचा संघ १५ गुणांसह गुणतालिकेत चौथ्या स्थानी आहे.

कसं आहे प्लेऑफचं समीकरण?

रविवारी साखळी फेरीतील शेवटचे २ सामने खेळवले जाणार आहेत. या २ सामन्यांवरुन प्लेऑफमध्ये जाणारा चौथा संघ कोणता? हे ठरणार आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स हे दोन्ही संघ भिडणार आहेत. जर या सामन्यात राजस्थान रॉयल्सने विजय मिळवला, तर पंजाब आणि कोलकाता स्पर्धेतून बाहेर पडतील आणि राजस्थानचा संघ प्लेऑफसाठी पात्र ठरेल. पण जर पहिल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा आणि दुसऱ्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव झाला, तर पंजाबचा संघ प्लेऑफसाठी पात्र ठरेल. पण जर राजस्थान रॉयल्सचा संघ पराभूत झाला आणि कोलकाता नाईट रायडर्सने विजय मिळवला, तर मग प्रश्न नेट रनरेटचा असेल. कारण ज्या संघाचा नेट रटरेट चांगला असेल, तो संघ प्लेऑफसाठी पात्र ठरेल. आता पंजाब किंग्स, राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या तिन्ही संघांपैकी कोणता संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु- गुजरात टायटन्स क्वालिफायर १ मध्ये भिडणार

प्लेऑफमध्ये जाणारे टॉप ३ संघ ठरले आहेत. पहिल्या स्थानी असलेला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ दुसऱ्या स्थानी असलेल्या गुजरात टायटन्ससोबत क्वालिफायर १ मध्ये भिडणार आहेत. तर सनरायझर्स हैदराबादचा सामना चौथ्या स्थानी असणाऱ्या संघासोबत होणार आहे. क्वालिफायर १ चा सामना जो संघ जिंकेल, तो थेट अंतिम फेरीत प्रवेश करणार आहे. तर हा सामना पराभूत होणाऱ्या संघाला फायनलमध्ये जाण्याची आणखी एक संधी मिळणार आहे.