आयपीएल २०२६ स्पर्धेतील ४७ वा सामना मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सने लखनौवर दमदार विजयाची नोंद केली. पहिल्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या लखनौ सुपर जायंट्सच्या फलंदाजांनी तुफान फटकेबाजी केली आणि संघाची धावसंख्या २२८ धावांवर पोहोचवली. ही धावसंख्या आणखी वाढू शकली असती, पण मुंबईच्या गोलंदाजांनी शेवटी चांगली गोलंदाजी केली. या धावांचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि रायन रिकल्टनने अर्धशतकी खेळी करून मुंबईला ६ गडी राखून विजय मिळवून दिला. दरम्यान मुंबईला प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी काय करावं लागेल? जाणून घा.

मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये प्रवेश करणार का?

मुंबई इंडियन्सचे आयपीएल २०२६ स्पर्धेतील १० सामने पूर्ण झाले आहेत. यापैकी ३ सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सला विजय मिळवता आला आहे. तर उर्वरित ७ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. मुंबईचे अजूनही ४ सामने शिल्लक आहेत. पुढील सामना १० मे ला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाविरुद्ध होणार आहे. त्यानंतर १४ मे ला पंजाब किंग्सविरुद्ध, २० मे ला कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध आणि २४ मे ला राजस्थान रॉयल्सविरुद्ध होणार आहे.

मुंबई इंडियन्सचा संघ आता १४ गुणांच्या पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळे मुंबईला इथून पुढे सर्व सामन्यांमध्ये विजय मिळवावा लागणार आहे. विजय मिळवण्यासह नेट रनरेटवरही लक्ष द्यावं लागणार आहे. जर मुंबईने पुढील चारही सामने जिंकले तर, मुंबईचा संघ १४ गुणांपर्यंत पोहोचू शकतो. पण त्यानंतरही प्लेऑफमध्ये स्थान मिळणं हा नशिबाचा भाग असेल.

यावेळी १४ गुणांसह प्लेऑफमध्ये स्थान मिळणं जरा कठीण दिसून येत आहे. कारण ५ संघ असे आहेत, जे आधीच १२ गुणांवर आहेत. त्यामुळे १-१ सामना जिंकून हे संघ १४ गुणांपर्यंत पोहोचू शकतात. जर मुंबईला प्लेऑफ गाठायचं असेल, त्यांना उर्वरित चारही सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागतील. यासह प्रार्थना करावी लागेल की, टॉप ५ मध्ये असलेल्या संघांपैकी कमीत कमी २ संघ १४ गुणापेक्षा पुढे गेले नाही पाहिजे.