आयपीएल २०२६ स्पर्धेतील अंतिम फेरीत जाणारे दोन्ही संघ ठरले आहेत. क्वालिफायर १ मध्ये झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने गुजरात टायटन्सवर एकतर्फी विजय मिळवून अंतिम फेरीत स्थान मिळवलं होतं. तर क्वालिफायर २ फेरीत गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सवर एकतर्फी विजय मिळवून अंतिम फेरीत स्थान निश्चित केलं आहे. आज दोन्ही संघ जेतेपदाची ट्रॉफी उंचावण्यासाठी पूर्ण जोर लावताना दिसून येणार आहेत. दोन्ही संघाकडे दुसऱ्यांदा जेतेपदाची ट्रॉफी उंचावण्याची संधी आहे. दरम्यान विजेत्या संघाला किती पैसे मिळणार? जाणून घ्या.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) कडून आयपीएल २०२६ स्पर्धेसाठी ४६.५ कोटी रुपयांच्या बक्षिसाची घोषणा केली आहे. जो संघ या हंगामात जेतेपदाचा मान मिळवणार त्या संघाला बक्षीस म्हणून २० कोटी रुपये दिले जाणार आहेत. यासह आयपीएलची ट्रॉफी दिली जाईल. त्यामुळे गुजरात टायटन्स की रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू? कोणता संघ दुसऱ्यांदा या ट्रॉफीचा मान पटकावणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
उपविजेत्या संघाला बक्षीस म्हणून किती रक्कम मिळणार?
अंतिम सामना गमावणाऱ्या संघाला ट्रॉफीशिवाय घरी जावं लागेल, पण बक्षिसाची रक्कम नक्की मिळेल. या स्पर्धेतील उपविजेत्या संघाला बक्षीस म्हणून १३ कोटी रुपये दिले जाणार आहेत. त्यामुळे उपविजेता संघ रिकाम्या हाती घरी परतणार नाही.
प्लेऑफमध्ये प्रवेश करणाऱ्या संघांना किती रक्कम मिळणार?
विजेत्या आणि उपविजेत्या संघासह आयपीएल २०२६ स्पर्धेत विजेत्या आणि उपविजेत्या संघासह प्लेऑफमध्ये प्रवेश करणारा संघ देखील मालामाल होणार आहे. या स्पर्धेतील क्वालिफायर २ सामना गमावणाऱ्या म्हणजेच राजस्थान रॉयल्स संघाला ७ कोटी रुपये दिले जाणार आहेत. तर गुणतालिकेत चौथ्या स्थानी राहिलेल्या म्हणजेच सनरायझर्स हैदराबादला ६.५ कोटी रुपये मिळणार आहेत. तर प्लेऑफसाठी पात्र न ठरलेल्या संघांना पैसे दिले जाणार नाहीत. यासह पर्पल कॅप विजेत्या आणि ऑरेंज कॅप विजेत्यांना रोख रक्कम दिली जाणार आहे.
