चेन्नई सुपर किंग्जचा मालक गुरुनाथ मयप्पन याच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. त्याच्या पोलीस कोठडीत ३१ मेपर्यंत वाढ झाली असून, त्याच्या आवाजाचे नमुने पोलिसांनी तपासणीसाठी ध्वनीमुद्रित करून घेतले आहेत. मय्यपन सट्टेबाजी प्रकरणात मुंबई पोलिसांच्या ताब्यात आहे. पोलिसांनी बुधवारी पुन्हा त्याची चौकशी केली. गुरुनाथ आणि अभिनेता विंदू रंधवा सांकेतिक भाषेमध्ये फोनवर एकमेकांशी बोलत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. हे संभाषण पोलिसांच्या हाती लागले असून त्या सांकेतिक भाषेचा अर्थ शोधण्याचे काम पोलीस करत आहेत.
चेन्नई येथील गुरुनाथच्या खाजगी जहाजातून पोलिसांना अ‍ॅपल कंपनीचा आयफोन सापडला असून त्यातील माहिती पोलीस तपासत आहेत. गुरुनाथकडून गुन्हे शाखेने एकूण तीन मोबाइल आणि पाच सिम कार्ड जप्त केले होते. ते सिम कार्ड, मोबाइलमधील क्रमांक आणि इतर माहितीचा पोलीस शोध घेत आहेत. विशेष म्हणजे गुरुनाथने त्याच्या चेन्नई येथील कंपनीत काम करणारा कर्मचारी कमलनाथ याच्या नावाने एक सिम कार्ड घेतले होते. हे सिम कार्ड गुरुनाथ वापरत होता. त्यामागच्या कारणाचाही पोलीस तपास करीत आहेत. गुरुनाथची पोलीस कोठडी बुधवारी संपल्याने दुपारी त्याला किला न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिसांनी त्याची पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी केली. त्याला गुरुनाथच्या वकिलांनी तीव्र आक्षेप घेतला. गेल्या पाच दिवसांत पोलिसांनी तपास केल्याचे सांगत त्यांनी पोलीस कोठडीला विरोध केला. पण न्यायालयाने गुरुनाथला ३१ मेपर्यंत पुन्हा गुन्हे शाखेच्या पोलीस कोठडीत पाठवले आहे.
तेंडुलकर ‘बटकू’, गेल ‘रावण’..
सट्टेबाजांच्या भाषेत खेळाडूंची सांकेतिक नावे तपासात उघडकीस
अभिनेता विंदूच्या डायरीत पोलिसांना सट्टेबाजीचे व्यवहार सांकेतिक भाषेत लिहिलेले आढळले होते. पण सट्टेबाज खेळाडूंचा उल्लेख करताना त्यांची थेट नावे घेणे टाळत होते. प्रत्येक खेळाडूसाठी त्यांनी सांकेतिक नाव ठेवले होते. फोनवर संभाषण करताना खेळाडूंच्या या सांकेतिक भाषेचा सट्टेबाज वापर करत होते, असे तपासात स्पष्ट होत आहे.
अंडरवर्ल्डमध्ये सट्टा लावण्याच्या खेळाला ‘कराची’ नावाने संबोधले जाते, तर एक कोटी रुपयाला ‘खोका’ म्हटले जाते. पण सट्टेबाज ‘खोका’ऐवजी ‘मिरची’ हा शब्द वापरत असल्याचे आढळून आले आहे.
अशी आहेत खेळाडूंची सांकेतिक नावे :  
सचिन तेंडुलकर : बटकू
महेंद्रसिंग धोनी : हेलिकॉप्टर
 ख्रिस गेल : रावण
लसिथ मलिंगा : मंकी
युवराज सिंग : मॉडल,
वीरेंद्र सेहवाग : चष्मा,
हरभजन सिंग : पगडी
सुरेश रैना : शेरएस
श्रीशांत : रोतडू
विंदू दारा सिंग रंधवा : जॅक
अजित चंडिला : मोगली
अंकित चव्हाण : कावळा
विराट कोहली : शायनिंग
आर. अश्विन : फिरकी
गुरुनाथ मय्यपन : गुरूजी
अशद रौफ : दादा