आयपीएलदरम्यान समोर आलेल्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणाने मी अतिशय नाराज आहे. मी अध्यक्षपदी असतो तर असे काही घडूच दिले नसते असे उद्गार आयसीसीचे तसेच बीसीसीआयचे माजी प्रमुख शरद पवार यांनी काढले. स्पॉटफिक्सिंग प्रकरणासंदर्भात पहिल्यांदाच पवार यांनी आपली भूमिका मांडली. जावई गुरुनाथ मयप्पन याच्या स्पॉटफिक्सिंगमधील कथित सहभागाच्या आरोपांमुळे बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी राजीनामा द्यावा की नाही हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. श्रीनिवासन यांच्या राजीनाम्याबाबत बोलण्यास मी योग्य व्यक्ती नाही असेही पवार पुढे म्हणाले. माझ्या कार्यकाळात मला सहकाऱ्यांची चांगली साथ लाभली. त्यांच्या पाठिंब्यामुळेच माझ्या कार्यकाळात काही चांगल्या गोष्टी घडून आल्याचे त्यांनी सांगितले. आयपीएलच्या सर्व सामन्यांची गृहमंत्रालयातर्फे चौकशी व्हावी ही शशांक मनोहर यांची मागणी योग्य असल्याचेही पवार म्हणाले.