वृत्तसंस्था, नवी दिल्ली : Indian Premier League Start today इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) या विश्वातील सर्वात लोकप्रिय ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या १६व्या अध्यायाला शुक्रवारपासून प्रारंभ होणार असून सलामीच्या लढतीत गतविजेत्या गुजरात टायटन्सपुढे महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज संघाचे आव्हान असेल. हा सामना अहमदाबाद येथील १ लाख ३२ हजार आसनसंख्या असलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘आयपीएल’ म्हणजे दर्जेदार क्रिकेटसह मनोरंजनाची पर्वणी असे समीकरण झाले आहे. चेन्नईचा कर्णधार धोनीचा हा अखेरचा ‘आयपीएल’ हंगाम असणार का? विराट कोहली आणि तारांकित खेळाडूंचा भरणा असलेला रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु संघ जेतेपदाचा दुष्काळ संपवणार का? रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सचा संघ गेल्या हंगामातील निराशाजनक कामगिरीनंतर दमदार पुनरागमन करणार का? अशा विविध प्रश्नांमुळे यंदाची ‘आयपीएल’ स्पर्धाही रंगतदार ठरणार आणि जवळपास दोन महिने क्रिकेटरसिकांचे भरपूर मनोरंजन होणार हे जवळपास निश्चितच आहे.

करोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या तीन वर्षांत संघांना आपापल्या घरच्या मैदानांवर सामने खेळता आले नव्हते. यंदा मात्र सर्व संघांना आपल्या चाहत्यांसमोर खेळण्याची संधी लाभणार आहे. त्यामुळे पाहुण्या संघांना सामने जिंकणे अधिक आव्हानात्मक ठरू शकेल. हे आव्हान जे संघ यशस्वीरीत्या पार करतील, त्यांना यशाची अधिक संधी असेल.  सलामीला हार्दिक पंडय़ाचा गुजरात टायटन्स आणि धोनीचा चेन्नई सुपर किंग्ज हे संघ आमनेसामने येतील. गतहंगामात या दोन संघांची कामगिरी पूर्णपणे भिन्न होती.

गुजरातने ‘आयपीएल’ पदार्पणातच जेतेपद मिळवण्याची किमया साधली होती, तर चार वेळचा विजेता चेन्नई संघ नवव्या स्थानी राहिला. त्यामुळे गुजरातच्या संघाची आपली दमदार कामगिरी सुरू राखण्याचे लक्ष्य असेल, तर चेन्नईच्या संघ जेतेपदासाठी आपली दावेदारी सिद्ध करण्याच्या उद्देशाने मैदानावर उतरेल. या सामन्यात विशेषत: धोनीच्या कामगिरीवर सर्वाचे लक्ष असेल. धोनी आता केवळ ‘आयपीएल’ खेळत असल्याने चाहत्यांना त्याचा खेळ पाहण्यासाठी बराच काळ वाट पाहावी लागते. धोनीने आपला अखेरचा अधिकृत सामना गेल्या ‘आयपीएल’मध्ये २० मे रोजी खेळला होता. तो गेल्या काही आठवडय़ांपासून चेन्नईच्या संघासोबत कसून सराव करतो आहे. त्यामुळे आपल्यात अजून बरेच क्रिकेट शिल्लक आहे, हे दाखवून देण्यासाठी धोनी नक्कीच उत्सुक असेल.

दुसरीकडे, हार्दिककडे भारताच्या मर्यादित षटकांच्या संघांचा भावी कर्णधार म्हणून पाहिले जात आहे. हार्दिकने गेल्या हंगामात कर्णधार म्हणून प्रभावित केलेच, शिवाय फलंदाजीत अधिक जबाबदारी घेताना गुजरात संघाकडून १५ सामन्यांत सर्वाधिक ४८७ धावा केल्या. आता तो हीच लय कायम राखतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

नव्या नियमांचा अवलंब

यंदाची ‘आयपीएल’ स्पर्धा काहीशी वेगळी ठरणार आहे. प्रभावी खेळाडू (इम्पॅक्ट प्लेयर), ‘व्हाईड’ आणि ‘नो-बॉल’साठी ‘डीआरएस’च्या वापरास परवानगी, तसेच नाणेफेकीनंतर अंतिम ११ खेळाडूंची घोषणा, चेंडू टाकण्यापूर्वी यष्टिरक्षकांच्या हालचालींवर मर्यादा अशा काही नव्या नियमांचा यंदाच्या हंगामात अवलंब केला जाणार आहे. या नियमांचा दहाही संघांचे कर्णधार आणि प्रशिक्षक कसा वापर करतात व त्याचा सामन्यांच्या निकालावर कितपत परिणाम होतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

चार संघांना नवे कर्णधार

यंदाच्या हंगामात चार नवे कर्णधार पाहायला मिळणार आहेत. ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर या जायबंदी असलेल्या खेळाडूंच्या अनुपस्थितीत अनुक्रमे दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांना नव्या कर्णधारांची निवड करावी लागली. दिल्लीचे डेव्हिड वॉर्नर आणि कोलकाताचे नितीश राणा नेतृत्व करेल. त्याचप्रमाणे एडीन मार्करमची सनरायजर्स हैदराबादच्या, तर शिखर धवनची पंजाब किंग्जच्या कर्णधारपदी निवड झाली आहे.

संघांबाबत थोडक्यात..

सनरायजर्स हैदराबाद  

  • कर्णधार : एडीन मार्करम
  • फलंदाजीची भिस्त : मयांक अगरवाल, हॅरी ब्रूक, एडीन मार्करम, राहुल त्रिपाठी, अभिषेक शर्मा
  • गोलंदाजीची भिस्त : भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक, आदिल रशीद, अकील हुसेन, टी. नटराजन
  • जेतेपद : एकदा (२०१६)
  • गेल्या हंगामातील कामगिरी : आठव्या स्थानी

दिल्ली कॅपिटल्स 

  • कर्णधार : डेव्हिड वॉर्नर
  • फलंदाजीची भिस्त : डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, मिचेल मार्श, रोव्हमन पॉवेल, रायली रुसो
  • गोलंदाजीची भिस्त : आनरिख नॉर्किए, अक्षर पटेल, कुलदीप यादव, चेतन साकारिया
  • जेतेपद : एकदाही नाही
  • गेल्या हंगामातील कामगिरी : पाचव्या स्थानी

राजस्थान रॉयल्स 

  • कर्णधार : संजू सॅमसन
  • फलंदाजीची भिस्त : संजू सॅमसन, देवदत्त पडिक्कल, यशस्वी जैस्वाल, शिमरॉन हेटमायर, जोस बटलर
  • गोलंदाजीची भिस्त : ट्रेंट बोल्ट, युजवेंद्र चहल, रविचंद्रन अश्विन, जेसन होल्डर 
  • जेतेपद : एकदा (२००८)
  • गेल्या हंगामातील कामगिरी : उपविजेते

गुजरात टायटन्स

  • कर्णधार : हार्दिक पंडय़ा
  • फलंदाजीची भिस्त : शुभमन गिल, केन विल्यम्सन, हार्दिक पंडय़ा, राहुल तेवातिया, डेव्हिड मिलर 
  • गोलंदाजीची भिस्त : मोहम्मद शमी, रशीद खान, यश दयाल, अल्झारी जोसेफ, हार्दिक पंडय़ा
  • जेतेपद : एकदा (२०२२)
  • गेल्या हंगामातील कामगिरी : विजेते

चेन्नई सुपर किंग्ज

  • कर्णधार : महेंद्रसिंह धोनी
  • फलंदाजीची भिस्त : ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉन्वे, बेन स्टोक्स, मोईन अली, अंबाती रायडू, रवींद्र जडेजा 
  • गोलंदाजीची भिस्त : दीपक चहर, रवींद्र जडेजा, मोईन अली, सिमरजीत सिंग
  • जेतेपद : चार वेळा (२०१०, २०११, २०१८, २०२१)
  • गेल्या हंगामातील कामगिरी : नवव्या स्थानी

लखनऊ सुपर जायंट्स

  • कर्णधार :  केएल राहुल
  • फलंदाजांची भिस्त : केएल राहुल, क्विंटन डीकॉक, निकोलस पूरन, दीपक हुडा, काएल मायर्स, मार्कस स्टोइनिस
  • गोलंदाजीची भिस्त : जयदेव उनाडकट, आवेश खान, रवी बिश्नोई, मार्कस स्टोइनिस, कृणाल पंडय़ा
  • जेतेपद : एकदाही नाही
  • गेल्या हंगामातील कामगिरी : चौथ्या स्थानी

पंजाब किंग्ज

  • कर्णधार : शिखर धवन
  • फलंदाजीची भिस्त : शिखर धवन, भानुका राजपक्षे, लिआम लिव्हिंगस्टोन, शाहरुख खान, प्रभसिमरन सिंग, जितेश शर्मा
  • गोलंदाजीची भिस्त : सॅम करन, अर्शदीप सिंग, कॅगिसो रबाडा, नॅथन एलिस, राहुल चहर, ऋषी धवन
  • जेतेपद :  नाही
  • गेल्या हंगामातील कामगिरी : सहाव्या स्थानी 

कोलकाता नाइट रायडर्स 

  • कर्णधार :  नितीश राणा 
  • फलंदाजांची भिस्त : नितीश राणा, नारायण जगदीशन, आंद्रे रसेल, वेंकटेश अय्यर, शाकिब अल हसन, रिंकू सिंह
  • गोलंदाजीची भिस्त : टीम साऊदी, सुनील नरीन, वरुण चक्रवर्ती, शार्दूल ठाकूर
  • जेतेपद : दोनदा (२०१२, २०१४)
  • गेल्या हंगामातील कामगिरी : सातव्या स्थानी

रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु 

  • कर्णधार : फॅफ डय़ूप्लेसिस
  • फलंदाजीची भिस्त : विराट कोहली, फॅफ डय़ूप्लेसिस, ग्लेन मॅक्सवेल, रजत पाटीदार, दिनेश कार्तिक, शाहबाज अहमद
  • गोलंदाजीची भिस्त : वानिंदू हसरंगा, शाहबाज अहमद, मोहम्मद सिराज, हर्षल पटेल 
  • जेतेपद : नाही
  • गेल्या हंगामात : तिसऱ्या स्थानी

मुंबई इंडियन्स 

  • कर्णधार : रोहित शर्मा
  • फलंदाजीची भिस्त : रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, इशान किशन, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, कॅमरून ग्रीन
  • गोलंदाजीची भिस्त : जोफ्रा आर्चर, जेसन बेहरनडॉर्फ, कुमार कार्तिकेय
  • जेतेपद : पाच वेळा (२०१३, २०१५, २०१७, २०१९, २०२०)
  • गेल्या हंगामातील कामगिरी : दहाव्या स्थानी
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl starts from today chennai super kings challenge against gujarat titans ysh
First published on: 31-03-2023 at 00:55 IST