आंतरराष्ट्रीय स्तरावर महिला क्रिकेटची लोकप्रियता हळूहळू वाढत आहे. त्यांच्यासाठी ट्वेन्टी-२०, एकदिवसीय सामने, कसोटी सामन्यांची संख्या वाढली आहे. त्यांना सुविधा व सवलती मिळत आहेत. असे असले तरी हा खेळ लोकाभिमुख होण्यासाठी त्यांच्याकरिताही आयपीएलसारख्या स्पर्धा आयोजित करण्याची गरज असल्याचे म्हटले जात आहे.
पुरुषांच्या मर्यादित षटकांच्या सामन्यांची विश्वचषक स्पर्धा १९७५ मध्ये सुरू झाली. महिलांची पहिली विश्वचषक स्पर्धा आयोजित करण्याचे प्रयत्न १९७१ मध्येच सुरू झाले होते. इंग्लंडमध्ये जून व जुलै १९७३ मध्ये पहिली अधिकृत विश्वचषक स्पर्धा आयोजित करण्यात आली. त्या वेळी ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड, जमेका, त्रिनिदाद व टोबॅको यांनी आपले संघ उतरविले. इंग्लंडने आपल्या युवा खेळाडूंचा संघही सहभागी करून घेतला. तसेच आफ्रिकेच्या पाच खेळाडूंसह एक आंतरराष्ट्रीय संघ तयार करून त्यालाही या स्पर्धेत भाग घेण्याची संधी दिली. ही स्पर्धा यशस्वी झाली तरी महिलांच्या क्रिकेटची गती अपेक्षेइतकी झाली नाही.
 महिला क्रिकेट क्षेत्राची जबाबदारी क्रिकेट नियामक मंडळाकडे (बीसीसीआय) आल्यानंतर महिलांच्या क्रिकेटला अधिक चांगले दिवस आले. या क्षेत्रातील मरगळ दूर होण्यास मदत झाली. महिला खेळाडूंना पायाभूत सुविधा व सवलती मिळू लागल्या. भारतात मंडळाकडे महिला क्रिकेटची सूत्रे आल्यानंतर या खेळाला थोडीशी गती आली आहे. राष्ट्रीय क्रिकेट अकादमी तसेच विविध राज्यांच्या अकादमीतही महिला खेळाडूंना सरावाची संधी मिळू लागली आहे. इतर अन्य क्षेत्रात जरी पुरुष व महिला यांना समान अधिकार व मान मिळत असले तरी अजूनही पुरुषप्रधान संस्कृतीचेच वर्चस्व आहे. अगदी अलीकडेच महिलांच्या विश्वचषक स्पर्धेत सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंना आपल्या हॉटेलपासून स्टेडियमवर चालत यावे लागले होते. घटकाभर संघव्यवस्थापन व क्रिकेट मंडळ यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे अशी घटना घडली असे म्हटले तरी महिला क्रिकेट अजूनही उपेक्षितच आहे. पुरुष खेळाडूंबाबत असे घडले असते तर साऱ्या प्रसारमाध्यमांनी क्रिकेट मंडळाच्या पदाधिकाऱ्यांवर सातत्याने टीकेची झोड उडविली असती व जबाबदार पदाधिकाऱ्याला घरी घालविले असते.
अजूनही पुरुष व महिला खेळाडूंना मिळणाऱ्या मानधनाबाबत व सवलतींबाबत खूप तफावत दिसून येते. समजा एखाद्या स्पर्धेसाठी पुरुष खेळाडूंना १५-२० लाख रुपयांचे मानधन मिळत असेल तर महिलांना तशाच मालिकेसाठी जेमतेम दोन-तीन लाख रुपये मिळतात. त्याचप्रमाणे जसे पुरुष खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर करारबद्ध केले जाते तसे करार महिला खेळाडूंसाठी करण्याची आवश्यकता आहे. महिलांच्या सामन्यांना प्रसिद्धी मिळत नाही, त्यांची दखल घेतली जात नाही अशी नेहमी ओरड असते. मात्र प्रसिद्धी व प्रायोजकत्व या दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही.
महिलांसाठी देशांतर्गत अधिकाधिक स्पर्धा आयोजित करण्याची आवश्यकता आहे. तालुका, शहर स्तरावरील स्पर्धाना चांगले प्रायोजक मिळविण्याची आवश्यकता आहे. जर आयपीएलसारखी स्पर्धा महिलांसाठी आयोजित केली गेली तर महिला खेळाडूंना अधिक चांगली प्रसिद्धी मिळेल. परदेशी खेळाडूंच्या सहभागामुळे आपोआपच सामन्यांना प्रेक्षकांचाही पाठिंबा अधिक मिळू शकेल.
महिला क्रिकेटच्या संयोजनात पुरुषांचेच वर्चस्व असते. मात्र संघटकांनी ज्येष्ठ महिला क्रिकेटपटूंना स्पर्धा संयोजन, संघ निवड, नैपुण्य शोध व विकास, प्रशिक्षण आदींबाबत अधिकाधिक संधी व वाव दिला तर उदयोन्मुख खेळाडूंनाही त्याबाबत अधिक विश्वास वाटू लागेल. सुदैवाने गेल्या काही वर्षांमध्ये क्रीडा क्षेत्रात करिअर करणाऱ्या महिलांची संख्या वाढली आहे. भारतीय महिला चूल व मूल यापलीकडे जाऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या देशाचा नावलौकिक उंचावू शकते हे आता सिद्ध झाले आहे. महिला क्रिकेटपटूंनाही नोकरीची हमी मिळाली तर या खेळात करिअर करण्याचे धाडस दाखविणाऱ्यांची संख्या वाढेल. सुविधा व सवलतींबरोबरच महिला क्रिकेटपटूंना आवश्यकता आहे ती सन्मानपूर्वक स्थान देण्याची. हे स्थान मिळाले तरच या खेळाची प्रगती अधिक चांगल्या रीतीने होईल.